Breaking News

सीमावाद सोडविण्याची चीनची इच्छा

अजित डोवाल करणार चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

नवीदिल्ली
भारत आणि चीनमध्ये लवकरच सीमा प्रश्‍नावर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे व त्या राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयानंतर भारत-चीनमध्ये सीमा प्रश्‍नी ही पहिलीच बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या अनौपचारिक परिषदेआधी डोवाल आणि वँग यांच्यात ही बैठक होऊ शकते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसीय चीन दौर्‍यात सीमा प्रश्‍नावर बैठकीचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद आहे. जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही बैठक आवश्यक आहे. कारण लडाखची सीमा चीनला लागून आहे. सीमा प्रश्‍नावर चीनकडून भारताला काही प्रस्ताव देण्यात आल्याचे वँग यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. चीनकडून आलेले प्रस्ताव म्हणजे सीमावादावर तोडगा काढण्याची त्यांची इच्छा असल्याचे संकेत आहेत.
भारताची नेहमीच सीमा वादावर तोडगा काढण्याची इच्छा राहिली आहे; पण या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या भारतीय अधिकार्‍यांच्या मते सीमावाद सोडवण्याला गती देण्याची चीनची इच्छा कधीच दिसली नाही. भारताने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरसंदर्भात एकतर्फी निर्णय घेणे टाळले पाहिजे, असा पवित्रा चीनने घेतला तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यावरही आक्षेप घेतला. लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे.