Breaking News

महाराष्ट्राच्या दोन तरुणांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणार्‍या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण सोमवारी करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सहसचिव असित सिंह उपस्थित होते.
देशभरातील 20 तरूण आणि तीन संस्थाना पुरस्कार वितरीत करण्यात आले असून 50 हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशीय संस्थेचाही सन्मान करण्यात आला.  ओंकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवनज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्य करत त्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. सलाम मुंबई फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. ओंकार एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. संसदवारी उपक्रमांतर्गत ओंकार याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
विनित मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना ‘राज्य युवा पुरस्काराने’ सन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांचा ‘राष्ट्रीय गौरव सन्मान 2018’ने गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा व युवा संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून विनित यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. संगणक अभियांत्रीकीत पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विनित यांनी जय योगेश्‍वर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.