Breaking News

झळाळी, पडझड आणि घसरण

देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी संपायला तयार नाहीत. महागाई दर कमी होत असल्याचं समाधान असताना दुसरीकडं सोन्याच्या किमती मात्र गगनाला भिडल्या आहेत. बचतीचं घटणारं प्रमाण, निर्यातीतील असमाधानकारक कामगिरी, शेअर बाजारातील पडझड आणि रुपयाचं डॉलरपुढं लोटांगण यामुळं आशावादी तरी कसं राहायचं, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.
भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरची करण्याचा मानस असताना दुसरीकडं मात्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं काहीच सकारात्मक घडताना दिसत नाही. महागाईचा दर घटल्याची एक सुवार्ता वगळली, तर इतर बाबतीत मात्र सारं काही धडकन वाढविणार्‍या आहेत. महागाईचा दर तीन टक्क्यांहून अधिक आहे. महागाई कमी झाली, म्हणजे सार्‍या चिंता मिटल्या असं होत नाही. उलट, बाजारात मंदीच इतकी आहे, की तिचाच जास्त धसका सर्वजण घेत आहेत. खर्च करायला कुणी तयार नाही. असं असलं, तरी त्यामुळं बचतीचं प्रमाण वाढतं म्हणावंं, तर तसंही नाही. बचत करून, गुंतवणूक करून परतावा मिळत नाही. शेअर बाजारात तर नुकसान होत आहे. म्युच्युअल फंडांनीही नांगी टाकली आहे. जेव्हा मंदी असते, तेव्हा सोन्यातील उलाढाल वाढते, हा अनुभव येतो. सध्याही भारत त्याच अवस्थेतून जातो आहे. सोन्यानं चेन्नईमध्ये नवा उच्चांक गाठला असून मंगळवारी(दि.13) येथील सराफ बाजारात प्रतितोळा सोनं 39 हजार 490 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचलं. भांडवली बाजारात निर्देशांकांची मोठी पडझड आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची गटांगळी सुरू असताना, मौल्यवान धातू सोने-चांदी मात्र तुफान तेजीवर स्वार होताना दिसत आहेत. मंगळवारच्या व्यवहारात मुंबईतील सराफ बाजारात स्टॅण्डर्ड सोनं तोळ्यामागं 600 रुपयांनी, तर चांदी किलोमागे तब्बल 1,200 रुपयांनी उसळून अनुक्रमे 37 हजार 795 रुपये आणि 44 हजार 280 रुपये पातळीवर गेली आहे. जागतिक अर्थ-राजकीय अनिश्‍चिततेनं समभाग बाजाराला मंदीचं ग्रहण लागलं असताना, अशा अस्थिर स्थितीत सुरक्षित आश्रयस्थान समजल्या जाणार्‍या सोन्या-चांदीकडं गुंतवणूकदारांचा ओढा आहे. परिणामी सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत निरंतर तेजी अनुभवायला मिळते आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’नं दिलेल्या माहितीनुसार, चांदीनं तब्बल दोन हजार रुपयांच्या किंमतवाढीसह विक्रमी 45 हजार  रुपयांचा विक्रमी स्तर ओलांडला आहे. मुंबईच्या सराफ बाजारात ‘आयबीजेए’ने प्रसिद्ध केलेल्या घाऊक किमतींनुसार, स्टॅण्डर्ड सोनं (0.995 शुद्धता) मंगळवारच्या व्यवहाराअंती 37 हजार 795 रुपये, शुद्ध सोनं (0.999 शुद्धता) 37 हजार 950 रुपये तर 0.916 शुद्धतेचं सोनं प्रति 10 ग्रॅम 34 हजार 760 रुपयांवर होतं. या घाऊक किमती असून, किरकोळ बाजारात स्थाननिहाय किमती आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. चांदीमध्ये (0.999 शुद्धता) किलोमागं 44 हजार 280 रुपये या पातळीवर मंगळवारचे घाऊक व्यवहार संपुष्टात आले. किरकोळ बाजारात चांदीचे भाव किलोमागे 46 हजार रुपयांवर गेले आहेत. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीनं न्यूयॉर्क बाजारात प्रति औंस (28.35 ग्रॅमसाठी) 1,520.37 डॉलरचा, तर चांदीनं प्रति औंस 17.32 डॉलरचा स्तर गाठला आहे. जागतिक तेजीच्या पार्श्‍वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या भारतातील किंमतीनंही चढता क्रम कायम ठेवला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही वाटाघाटीसाठी ते तयार नसल्याचं विधान करून आगामी महिन्यांतील चीनबरोबरच्या व्यापारविषयक चर्चेच्या निष्फळतेकडं निर्देश केला आहे. परिणामी जगभरात सर्वत्र भांडवली बाजारात मोठया  प्रमाणात घसरण दिसून आली आणि गुंतवणूकदारांनी शाश्‍वत मूल्य असलेल्या सोने-चांदीकडं पैसा वळवून आश्रय मिळविला. सोन्याची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेला आणि सर्वांत मोठा आयातदार देश असलेल्या भारतात, तरी या मौल्यवान धातूच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांवरच ठरत असतात. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतींनी सोमवारपर्यंत वार्षिक 17 टक्क्यांनी वाढ दर्शविली आहे. प्रति औंस 1,520.37 डॉलर हा त्याचा सहा वर्षांतील उच्चांकी स्तर आहे. भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीनं सोन्यातील तेजीला आणखीच बळ दिलं आहे. ते पाहता काही दिवसांत सोन्यानं तोळ्यामागं 40 हजार रुपयांचा अभूतपूर्व स्तर गाठल्यास नवल नाही. मागील एका आठवडयात सोनं 1,930 रुपयांनी वधारलं आहे, तर मंगळवारच्या एका दिवसांत त्यानं सहाशे रुपयांनी उसळी घेतली आहे. किंमती वाढत असून स्थानिक बाजारात सोन्याची मागणी चढीच आहे. आगामी काळातील लग्न मुहूर्त आणि सणोत्सवाचा हंगाम पाहता, किमती वाढण्याच्या शक्यता गृहीत धरून लोकांकडून आगाऊ खरेदी सुरू आहे. औद्योगिक उत्पादन दर, महागाई दर तसंच व्यापार तूट आदींचा कल रुपयाला नजीकच्या कालावधीत डॉलरच्या तुलनेत 72 पर्यंत घेऊन जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थघडामोडींनी स्थानिक चलन मंगळवारीच सहा महिन्यांच्या तळात पोहोचलं आहे. मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत थेट 62 पैशांनी आपटत 71.40 पर्यंत खाली आला. रुपयाचा हा गेल्या सहा महिन्यांतील नीचांक ठरला. अर्थव्यवस्थेबाबतची काही आकडेवारी येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे, तेव्हा रुपया 72 पर्यंत घसरल्यास आश्‍चर्य वाटू नये.
जगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले आहेत. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्स 600 अंकांच्या घसरणीसह 37 हजारांच्या खाली आला, तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 11 हजारांच्या खालीपर्यंत आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 173 अंकांनं उसळून तो 37 हजार 755 अंकांवर उघडला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. येस बँकेचे शेअर 52 आठवड्याच्या खाली घसरले, तर दुसरीकडं रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सनं या दशकातील सर्वात मोठी उसळी घेतली. 18 महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रिजवरील सर्व कर्जे फेडली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली, सौदी अरामको ’आरआयएल’च्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील 20 टक्के भागभांडवल खरेदी करणार असून, त्याचं एकूण मूल्य 75 अब्ज डॉलर (अंदाजे पाच लाख 32 हजार 466 कोटी) इतकं आहे. पुढील महिन्यात रिलायन्सच्या जिओ फायबरची सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आल्यानं या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळं आज बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर वधारले; परंतु अन्य शेअर्संनी आपटी खाल्ली. रिलायन्सच्या समभागाचं मूल्य मंगळवारच्या व्यवहारात 12.09 टक्क्यांनी झेपावलं. देशातील वाहन क्षेत्राबाबत निर्मिती संघटनेनं जाहीर केलेल्या चिंताजनक आकडेवारीनं भांडवली बाजारात सूचिबद्ध वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यांनीही गटांगळी खाल्ली.
वाहन क्षेत्रातील समभागांचं मूल्य व्यवहारात नऊ टक्क्यांपर्यंत रोडावलं. यामध्ये प्रत्यक्ष वाहन निर्मिती तसंच वाहनांसाठी सुटे भाग तयार करणार्‍या कंपन्यांचाही समावेश राहिला. वाहन निर्मिती संघटना ‘सिआम’ने जुलैमधील वाहन विक्री कल जाहीर करताना या क्षेत्रानं दोन दशकातील सर्वांत मोठी विक्री घसरण नोंदविली.