Breaking News

कष्टकरी वर्गाला पुन्हा उभे राहण्यास आधार देऊया

जयंत पाटील यांची भावनिक साद

सांगली
अजून आपले काम संपलेले नाही. सर्वांची ताकद एकत्र करुन या कष्टकरी वर्गाला पुन्हा उभे राहण्यास आधार देऊया. सगळ्यांनीच मिळून आपल्या लोकांना सढळ हस्ते मदत करुया असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. आज जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन भावनिक साद घातली आहे.
सांगलीतील पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेले चार दिवस दिवसरात्र मेहनत घेणार्या जयंत पाटील यांनी जनतेला तुमच्या सोबत सदैव असल्याचे सांगितले आहे. शेतकरी पूर्णत: उध्दवस्त झाला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असणार्‍या कष्टकरी वर्गाचा संसार, व्यवसाय पुन्हा उभा करून देण्याची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महापुराचे दुष्परिणाम महापूर ओसरतो तेव्हा अधिक गडदपणाने समोर यायला लागतात. तेव्हा खूप मोठ्या सहकार्याची आवश्यकता आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे. सांगलीतील बहेबोरगाव, खरातवाडी येथे पुरग्रस्त भागात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट देऊन लोकांची आस्थेने विचारपुस केलीच शिवाय तेथील जनावरांना चारा उपलब्ध करून दिला.