Breaking News

दिल्लीतील रोहिदास मंदिर पुन्हा बांधा : प्रहार वारकरी संघटना

अहमदनगर/प्रतिनिधी
“दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहाशे वर्ष जुने असलेले संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे मंदिर पाडले आहे. दिल्लीतील पाडलेले पुरातन मंदिर त्याच जागेवर पुनर्निर्मित करावे’’ अशी मागणी प्रहार वारकरी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने मंगळवारी (दि.13) जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, संतोष पवार, विनोद सिंग परदेशी, सिद्धनाथ महाराज मेटे, अजित धस, प्रकाश बेरड, कांबळे सर आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, संत शिरोमणी रोहिदास महाराज हे चर्मकार समाज, शीख समाज आणि वारकरी सांप्रदाय तसेच भारत व जगातील लाखो लोकांना वंदनीय असलेले संत आहेत. तेराव्या शतकात त्यांनी समतेचा पुरस्कार केला आणि आपले जीवन समाजासाठी अर्पण केले. उत्तर भारतामध्ये नव्याने धर्म आणि सत्य त्यांनी सांगितले. अशा महान संतांचे मंदिर स्थान सिकंदर लोधी यांच्या राजवटीत दिल्ली जवळील तुगलकाबाद येथे बांधले. मंदिर बांधले तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी या संस्था अस्तित्वातच नव्हत्या. इंग्रज राजवटीमध्ये ही जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत गेली. आता ही जागा दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी यांच्या ताब्यात गेली.
दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने मंदिरासाठी ही जागा राखीव आरक्षित करावयास हवी होती आणि त्या बदल्यात वनविभागाला तेवढीच दुसरी जमीन द्यायला हवी होती. असे न घडल्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने कायद्याप्रमाणे मंदिर रिकामे करण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने प्रचलित कायद्याप्रमाणेच आदेश दिला. दरम्यानच्या काळामध्ये जर दिल्ली डेव्हलपमेंट प्राधिकरणाने मंदिरासाठी जागा दिली असती तर हे पुरातन मंदिर पडले नसते.
मंदिर पाडल्यामुळे  पंजाबमधल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. दिल्ली, उत्तर प्रदेश व भारतातील अनेक प्रांतांमध्येही या गोष्टीचा निषेध करण्यात आला. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने व्यवस्थित बाजू मांडली गेली नाही, असा आरोप सर्व स्तरातून केंद्र सरकारवर होत आहे.
उद्ध्वस्त केलेले मंदिर हे भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा मोठा मानबिंदू होते. त्यामुळे दिल्ली डेव्हलपमेंट प्राधिकरणाने ही जागा संत रोहिदास महाराजांच्या मंदिराला द्यावी व याच ठिकाणी या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन प्रहार वारकरी संघटनेने दिल्लीचे नायब राज्यपाल यांना जिल्हाधिकारी  यांच्याद्वारे देण्यात आले.