Breaking News

रॉकेट इंजिनाच्या स्फोटानंतर रशियात वाढला किरणोत्सर्ग

मॉस्को
रशियात लष्करी चाचणी तळाजवळ एक रहस्यमयी अपघात झाला आहे. त्यानंतर उत्तर रशियाच्या दोन शहरातील नागरिकांनी घरात आयोडिनचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. किरणोत्सर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी आयोडिनचा वापर केला जातो. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघातासंबंधी माहिती देण्याचे टाळले आहे. उत्तर रशियात चाचणी तळाजवळ एका रॉकेट इंजिनचा स्फोट झाला. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

स्फोटानंतर घातक रसायने वातावरणात मिसळलेली नसून किरणोत्सर्गाच्या पातळीमध्येदेखील बदल झालेला नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. चाचणी तळाजवळ असणार्‍या सेवेरोड्विंन्स्क शहरातील अधिकार्‍यांनी किरोणोत्सर्गाच्या पातळीमध्ये वाढ नोंदवली आहे. या अपघातामुळे किरोणोत्सर्ग का वाढला, त्याविषयी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सेवेरोड्विंन्स्क आणि अर्खन्गेस्क शहरातील औषध दुकानातील आयोडिनचा साठा संपला आहे.

सेवेरोड्विंन्स्कमध्ये अण्वस्त्र पाणबुडयांची निर्मिती केली जाते. आज मोठया प्रमाणावर लोक आयोडिन खरेदी करण्यासाठी आले. आमच्याकडे अजूनही आयोडिन शिल्लक आहे, असे एका औषध विक्रेत्याने सांगितले. रशियन प्रशासनाने सफेद सागरातील अपघात स्थळाजवळच्या जागेवर सागरी वाहतूक महिन्याभरासाठी बंद केली आहे. त्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. रशियात न्योनोक्सा येथे शस्त्रास्त्रांची चाचणी केली जाते. रशियन नौदलाकडून ज्या बॅलेस्टिक, क्रूझ मिसाइलचा वापर होतो, त्याची चाचणी येथे केली जाते.