Breaking News

सूर्योदय परिवाराचे कार्य अविरतपणे चालणार: डॉ. देशमुख

कोल्हार/प्रतिनिधी

 राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर सूर्योदय परिवाराचे कार्य थांबले असा काही विघ्नसंतोषी मंडळींनी अपप्रचार केला. परंतु सूर्याचा कधी अस्त होत नाही सूर्याला ग्रहण लागते परंतु ग्रहण संपल्यानंतर पुन्हा सूर्याचा प्रकाश अधिक तेज होतो. त्याच प्रमाणे सूर्योदय परिवाराचे कार्य हे भारतभर अविरतपणे सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉक्टर आयुषी उदयसिंह देशमुख यांनी केले.

 कोल्हार येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आल्या असता त्यांनी संवाद साधला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत सूर्योदय परिवाराचे अनिल परदेशी, धीरेंद्र व्यास व सूर्योदय परिवारातील सदस्य हजर होते.

  यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शिक्षण व आरोग्य व व्यवसाय ही देशातील महत्त्वाची गरज आहे. येणाऱ्या काळात जेवढी गरीब जनता आहे त्यांच्या शिक्षण, आरोग्य व व्यवसायासाठी सूर्योदय परिवार कार्यरत राहून त्यांचे जीवन प्रकाशमान करणार आहे. असे सांगून त्या म्हणाल्या आजच्या युवावर्गाला माझे असे सांगणे आहे की ,लोकांना जेवढी मदत करता येईल व लोकांच्या कार्यासाठी आपण समर्पण करू तेवढे आपले जीवन सफल होईल. कारण युवा या शब्दाचा उलटा अर्थ होतो वायू आणि वायूच्या गतीने युवावर्गाने देशाची प्रगती करावी व उद्धार करावा हीच अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुंभकर्ण परिवाराच्यावतीने अर्चना कुंभकर्ण यांनी डॉक्टर आयुषी यांचा सत्कार केला.