Breaking News

डीएसकेंचा भाऊ मकरंद कुलकर्णीला अमेरिकेला पळून जात असताना अटक

पुणे / प्रतिनिधी
कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणार्‍या दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना अमेरिकेला पळून जात असताना पोलिसांनी मुंबईत अटक केली.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी व पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात डीएसके दांपत्यासह त्यांचे नातेवाइक आणि कंपनीमधील इतरांचा समावेश आढळून आला होता. त्यानुसार, पोलिसांनी यापूर्वी मुलगा शिरीष, मुलगी यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली आहे. डीएसके दांपत्य सध्या येरवडा कारागृहात आहे. या गुन्ह्यात त्यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी यांचा पैसे वळविल्याप्रकरणात समावेश आढळून आला होता; मात्र ते पोलिसांना सापडले नव्हते. त्यांचा शोध घेण्यात येत होता. मंगळवारी (ता. 13) सकाळी मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांनी मकरंद यांना ताब्यात घेतले. त्या वेळी ते अमेरिकेत पळून जात असल्याची प्राथमिक माहिती समजली. मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली.