Breaking News

दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखाची रोकड लंपास

संगमनेर/प्रतिनिधी
दुचाकीची डिक्की उचकून त्यात असलेली एक लाख रुपयाची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना काल मंगळवार दि.१३ रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास तालुक्यातील चिखली गावात घडली.

  याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब निवृत्ती कडलग (रा.जवळेकडलग, ता.संगमनेर) यांनी काल दि.१३ रोजी संगमनेर शहरातील एका खासगी बँकेतून एक लाख रुपायाची रोख रक्कम काढली होती. एक लाख रुपयाची रोकड शंभरच्या नोटांचे १० बंडलच्या स्वरुपात असल्यामुळे त्यांनी ही रोकड दुचाकीच्या (क्र.एम.एच. १७ बी.डब्लू. २४७२) डिक्कीत ठेऊन ते जवळेकडलगला निघाले. रस्त्यात भेळ घेण्यासाठी चिखली येथे थांबले असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीतील रोकड डिक्की दुसऱ्या चावीच्या सहाय्याने उचकून अज्ञात चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार भाऊसाहेब कडलग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.