Breaking News

मला ईडीची कोणतीही नोटीस आलेली नाही - राज ठाकरे

मुंबई 
 मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असून लवकरच त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त काही दिवसांपुर्वी आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना ही माहिती दिली. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत विरोधात प्रचार करु नये यासाठी भाजपाने ईडीच्या मार्फत कारवाई करत रणनीती आखल्याची सुत्रांची माहिती होती.
राज ठाकरे ईडीच्या निशाण्यावर, लवकरच बजावणार समन्स
राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितलं की, वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. मी पत्रकारांना म्हणलं की अशाच धमक्या तुमच्या मालकांना दिल्या जात आहेत, आणि म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही सत्य मांडू शकत नाही आहात. एक दोन अपवादात्मक माध्यमं सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवर पण वरून दडपण आणलं जात आहे. आणि हे सगळं बहुमताच्या जोरावर अशी टीका यावेळी राज ठाकरेंनी केली.
काय होतं वृत्त ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने भाजपामध्ये चिंतेचं वातावरण आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती होती.
राज ठाकरे यांना मुंबईतच अडकून ठेवण्याची योजना आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना वारंवार ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल आणि तासनतास प्रतिक्षा करत बसवून ठेवण्यात येईल.