Breaking News

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माथेरानकर सरसावले: महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; व्यापार्‍यांची उदासीनता

माथेरान / प्रतिनिधी /
प्रत्येक वेळी कुठेही काही अडचणी निर्माण झाल्या त्या त्या वेळी माथेरानकर नेहमीच आपल्या यथानुशक्ती मदतीला धावून जात आहेत. नुकताच सांगली आणि कोल्हापूर मध्ये पूरस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत अशावेळी राज्यातील सर्वच भागातून तेथील नागरिकांना मदत प्राप्त होत आहे. त्यासाठी आपला सुद्धा यामध्ये खारीचा वाटा असावा याच सद्भावणेने माथेरान नागरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या सहकारी लोकप्रतिनिधी सोबत पुढाकार घेऊन दि. 11 रोजी सकाळी अकरा वाजल्या पासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत महात्मा गांधी मार्गावरील कम्युनिटी सेंटर (शास्त्री हॉल) येथे पूरग्रस्तांना मदतीचा हातभार लावण्यासाठी मदतीचे जाहीर आवाहन केले होते. त्यानुसार येथील नागरिकांनी आपल्या यथानुशक्ती मदत केली आहे. यामध्ये विशेषतः महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. महिला आघाडीच्या वतीने रोख रक्कम, तर कुणी साड्या, कपडे, चादर, टॉवेल, नवीन चप्पल जमा केल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी कचरा वेचक महिलांनी आपल्या स्वतःच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावल्या.
शशिकला साळुंके या वयस्कर महिलेने आजारी असताना सुध्दा आपल्या जवळील नवीन साड्या तर लता ठाकरे, हेमा कदम, कमल गायकवाड, विद्या सातपुते, मनीषा शिंदे, हातोले या महिलांनी सुद्धा आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांची उणिधुनी काढणारी मंडळी त्याचप्रमाणे व्यापारी लोकांची या मदतकार्यासाठी उदासीनता दिसून आली. हॉटेल व्यावसायिकांनी  बर्‍यापैकी मदत केली आहे. गावातील नागरिकांनी सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
यामध्ये बिसलेरी पाण्याचे 325 बॉक्स, तांदूळ 525 किलो, तूरडाळ 300 किलो, कांदे बटाटे 100 किलो, कडधान्ये 225 किलो, साखर 200 किलो, पोहे 75 किलो, बिस्कीट बॉक्स 35, गोडेतेल 94 किलो, मॅग्गी 4 बॉक्स मोठे, चहापावडर 20 किलो 600 ग्राम, पीठ 125 किलो, मसाला  20 किलो अशाप्रकारे सर्व साहित्य गटनेते प्रसाद सावंत यांनी नगरपालिका मुकादम चंद्रकांत शेटे यांच्या मार्फत कर्जत तहसील कार्यालयाकडे पूरग्रस्तांसाठी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक पी. काळे यांनी हजेरी लावून सर्वांचे आभार मानले. यावेळी मदतकार्यासाठी शेकापचे अध्यक्ष शफीक शेख, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम, निमेश मेहता, वनसमिती सदस्य नितीन सावंत,चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे, सचिन दाभेकर,ज्ञानेश्‍वर सदगीर, रवी परब, संगिता जांभळे महिला आघाडी शहर संघटक,महिला आघाडी संपर्क संघटक प्रिती  कळंबे, महिला आघाडी उपशहर संघटक समीना महापुळे, माजी महिला आघाडी अध्यक्षा सुहासिनी शिंदे, शलाका शेलार, स्मिता गायकवाड, योगिता चौगुले, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.