Breaking News

नागरिकांना खतनिर्मिती टोपल्यांचे वाटप

मुंबई
स्वच्छ भारत अभियानात मुंबईचा घसरणारा क्रमांक सावरण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून निर्माण होत असलेल्या ठिकाणीच ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मितीला चालना मिळावी यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढविली आहे. मुंबईकरांना घरातच ओल्या कचर्‍यापासून खत निर्माण करता यावे यासाठी त्यांना खतनिर्मिती टोपल्या (डबे) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टोपल्या नगरसेवक निधीतून खरेदी करण्याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये दररोज 7200 मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. छोट्या-मोठ्या सोसायट्यांनी कचर्‍याचे वर्गीकरण आणि ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मितीस सुरुवात केल्यामुळे एकूण कचर्‍यातील दोन हजार मेट्रिक टन कचर्‍याची विल्हेवाट तो निर्माण होत असलेल्या ठिकाणीच लागत आहे. यामुळे कचरा वाहून नेण्याच्या खर्चाची बचत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानात घराघरांत ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यास प्रोत्साहन देणार्‍या पालिकेला विशेष गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेने आता घरोघरी ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना खतनिर्मिती टोपल्या देण्याचा निर्णय घेतला आहे. टोपल्या मिळताच नागरिकांना ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती सुरू करावी लागणार आहे. मात्र खतनिर्मितीच्या टोपल्या उपलब्ध केल्यानंतर संबंधित नागरिकांच्या घरचा वा सोसायटीतील ओला कचरा उचलण्यात पालिकेतर्फे येणार नाही. या मंडळींचा केवळ सुका कचरा पालिका उचलणार आहे.
स्वच्छ भारत अभियानातील या निकषाची पूर्तता करण्यासाठी तब्बल दीड लाख घरांमध्ये या टोपल्यांचे वितरण करावे लागणार आहे. खतनिर्मितीची एक टोपली 300 ते 700 रुपयांना मिळते. खतनिर्मिती टोपल्या आणि तत्सम उत्पदनांसाठी पालिकेने स्वारस्याची अभिव्यक्ती मागविली आहे.
आपल्या प्रभागांमध्ये छोटी-मोठी कामे करण्यासाठी नगरसेवकांना प्रशासनाकडून नगरसेवक निधी देण्यात येतो. या निधीमधून नगरसेवक प्रभागातील पायवाटा, शौचालये, पदपथांची दुरुस्ती, लादीकरण अशा स्वरूपाची कामे करीत असतात. मुंबईकरांना घरामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवता यावा यासाठी त्यांना दोन डबे देण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. हे डबे नगरसेवक निधीमधून खरेदी करावे आणि त्यांचे आपल्या प्रभागातील मतदारांमध्ये वितरित करण्याची आग्रही मागणी नगरसेवकांकडून केली होती. अखेर प्रशासनाने नगरसेवकांची मागणी मान्य केली. त्यानंतर नगरसेवक निधीमधून खरेदी केलेल्या कचर्‍याच्या डब्यांवर संबंधित नगरसेवकांचे नाव, प्रभाग क्रमांक कोरून ते मतदारांना वितरित करण्यात आले होते. या धर्तीवर नागरिकांसाठी नगरसेवक निधीमधून खतनिर्मिती टोपल्या खरेदी करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

खतनिर्मिती टोपली
ओल्या कचर्‍यामध्ये जिवाणूंमार्फत प्रक्रिया होते आणि त्याचे खत बनते. टोपलीमध्ये उपलब्ध केलेल्या जिवाणूंच्या विरजणाद्वारे ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया होते आणि काही दिवसांतच कचर्‍यापासून खत तयार होते. या टोपलीत ओल्या कचर्‍याचा चोथा, भाजीचा नको असलेला भाग बारीक करून टाकावा लागतो. हा कचरा काठीच्या साह्याने जिवाणूच्या विरजणात मिसळावा लागतो. या प्रक्रियेतून टोपलीत ओलसर खत तयार होते. हे खत 25 ते 30 दिवसांनी झाडाच्या बुंध्याशी टाकता येऊ शकते.

स्वच्छ भारत अभियानातील निकषानुसार नगरसेवकांमार्फत अधिकाधिक घरांमध्ये खतनिर्मितीच्या टोपल्या पोहोचविण्याचा मानस आहे. या संदर्भात छाननी सुरू असून टोपल्यांचा दर निश्‍चित झाल्यानंतर त्या खरेदी करण्यात येतील. नगरसेवक निधीमधून खतनिर्मिती टोपल्या देण्याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात येईल.
 किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त