Breaking News

चांद्रयानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

नवी दिल्ली
चांद्रयान-2 ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली आहे. आता चांद्रयान-2 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. 20 ऑगस्टच्या सुमारास चांद्रयान -2 चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचेल, अशी माहिती ‘इस्रो’कडून देण्यात आली.

चांद्रयान -2 ची पृथ्वीच्या कक्षेतील शेवटची आणि अत्यंत महत्वाची हालचाल पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी यानाला सज्ज करण्यात ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. आज (ता.14) पहाटे दोन वाजून एकवीस मिनिटांनी ही यशस्वी हालचाल घडवून आणण्यात आली. पुढील सहा दिवस चांद्रयान आपला चंद्राच्या दिशेने प्रवेश सुरू ठेवणार असून 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यानंतर 20 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2 हे चंद्राच्या कक्षेत पोहोचेल, अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी दिली. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल, असे त्यांनी सांगितले.

चंद्राच्या नजीक पोहोचल्यानंतर चांद्रयान-2 चे प्रोपल्शन सिस्टम पुन्हा एकदा फायर करण्यात येणार आहे. त्यामुळे या यानाची गती कमी होईल. हे यान चंद्राच्या प्राथमिक कक्षेत स्थिरावणार आहे. त्यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर चांद्रयान दोन फेर्‍या मारेल. प्रोपल्शन सिस्टमच्या मदतीने चांद्रयान 2 ची कक्षा कमी केली जाणार असल्याची माहिती, सिवन यांनी दिली. जवळपास 1203 सेकंदात हे इंजिन सुरू होते. त्यामुळे चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत धाडण्यासाठी आवश्यक अशा ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात आले आहे. पृथ्वीवरून भूस्थिर कक्षेत पाठवल्यापासून चांद्रयान-2 ची कक्षा बदलण्याची पाचवी वेळ होती.