Breaking News

पूरग्रस्तांचे सर्वप्रकारचे कर्ज माफ करा : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पूरपरिस्त्तिी गंभीर असून, लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ते पुन्हा उभारण्याची गरज आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व पूरग्रस्तांचे सर्वप्रकारचे कर्ज माफ करा, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केली. जिल्ह्यातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण कोल्हापूरात आले होते. यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
राष्ट्रीय आपत्ती जाहीर होणार किंवा नाही? शासन आदेश काय सांगतो? याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. त्यासाठी लोकांच्या खिशात नुकसानिचे किती पैसे पडणार ते सांगा? असा सवाला चव्हाण यांनी केला. यावेळी चव्हाण म्हणाले, सरकारी नियम आणि घोषणा बाजूला राहू देत, पुरग्रस्तांच्या खिशात किती मदत शासनाकडून येणार हे महत्वाचे आहे. कमिट्या होतील. इतर मदत मिळत राहील, मात्र पुरस्थितीनंतरचा मुकाबला करण्यासाठी योग्य ती मदत मिळण्याची गरज आहे. केंद्रीय आपत्ती निवारण समिती व राज्याच्या समिती यांच्या समन्वयाने मदतीचे दर ठरतात. एप्रिल 2015 मध्ये दरपत्रक जाहीर झाले आहे. चार वर्षापूर्वीच्या मदतीचा दर आता आम्हास मान्य नाही. प्रती व्यक्ती 60 रुपये भत्ता व जनावरांना 100 रुपये हे आपत्तीदरपत्रक कालबाह्य आहे. ही मदत किमान दुप्पट करा. पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा किंवा नका करु. त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मदतीची रक्कम महत्वाची आहे. लोकांची पुराच्या पाण्यात सर्व कागदपत्रे गेली आहेत. लोक बँकेतून पैसे कसे काढणार? आधार कार्डसह इतर कागदपत्रे नव्याने करावी लागणार आहेत. त्यामुळे लोकांची पुराच्या पाण्यात ओळख पुसली गेली आहे. त्यावर शासनाने तात्काळ उपाय योजना करावी. कागदपत्र नसल्याने लोकांना भविष्यात मोठ्या अडचणी आहेत. त्यावर आत्ताच उपाय शोधले पाहिजेत. आज मदतीचा खूप मोठा ओघ येत आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. जिल्ह्याची नेमकी काय गरज आहे? याचा आढावा घेवून जिल्हाधिकार्‍यांनी प्रसारमाध्यांच्या माध्यमातून नेमके काय हवे आहे, हे जाहीर करण्याची गरज आहे. शासन आरोग्यासाठी वैद्यकीय पथक पाठवत आहे. औषधांचा तुटवडा पडणार नाही. रोगराई पसरवणार नाही. याची काळजी घ्यावी लागेल. अनेक खासगी डॉक्टर काम करण्यास तयार आहेत. अशा उत्स्फूर्त मदतीला प्रशासनाने दिशा देण्याची गरज आहे. मदतरुपाने उगीचच सामान येवून पडल्यास त्याचा उपयोग होणार नाही. पूर ओसरल्यानंतर हे लोक जेव्हा घरी जातील तेव्हा उद्भवणार्‍या समस्यांचा सामना करणे इतके सोपे नाही. नवा संसार उभा उभारण्याकरता जे काही मदत लागेल ती करावी लागेल. घरे आणि पिकांचे पंचनामे करुन त्याचे तात्काळ पैसे मिळावेत. गाई व म्हैशी या जनावरांचा बिकट प्रश्‍न आहे. हे नुकसान भरुन काढावे लागेल. या आपत्तीला अनेक पैलू आहेत. एकाच पैलूवर विचार करुन भागणार नाही. शहर व ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजावे लागतील, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.