Breaking News

पूरग्रस्तांसाठी पोलिस क्रेडिट सोसायटीची मदत

अहमदनगर/प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी द्यायला हवा. सामाजिक संस्थांबरोबरच सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. समाजात सामाजिक भावना टिकून राहिल्यास अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. पोलिस मुख्यालय येथील पोलिस क्रेडिट सोसायटीने नेहमीच आपल्या कार्यकुशलतेने सामाजिक भावना जपत आली आहे. त्यांनी पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक इशु सिंधू यांनी केले.

   पोलिस मुख्यालय येथील पोलिस क्रेडिट सोसायटीच्यावतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 लाख  रुपयांच्या मदतीचा धनादेश सोसायटीचे अध्यक्ष राजू सुद्रिक यांनी जिल्हा पोलिस प्रमुख इशु सिंधू यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष सुमन दिघोळे, संचालक संजय चोरडिया, राजू वैरागर, दिनेश मोरे, अंजली बर्डे, लक्ष्मण खोकले, प्रकाश पाठक, भाऊसाहेब निमसे, सचिन शिरसाठ, बाळासाहेब कणगरे, सतीश भांड, दीपा आठवले, प्रसाद आळकुटे आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना  सुद्रिक म्हणाले की, विविध वस्तू, अन्नधान्याची  मदत पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. त्यामुळेच आम्ही सोसायटीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी निर्णय घेऊन रोख मदत देण्याचे ठरविले. त्यानुसार मदतीचा धनादेश जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला आहे.