Breaking News

डुक्कर आणि गाईचे मांस पोचविण्यास विरोध

‘झोमॅटो’चे कर्मचारी रस्त्यावर; 1857 नंतर दोन्ही समाज एकाच मुद्यावर एकत्र


कोलकाता
आठवडाभरापूर्वीच एका ग्राहकाला दुसर्‍या समाजाचा डिलिव्हरी बॉय नको होता, म्हणून या ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचा वाद शमत नाही, तोच झोमॅटो पुन्हा नव्या वादात सापडला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात त्यांच्या डिलिव्हरी बॉयनीच आंदोलन छेडले आहे.
झोमॅटोने पश्‍चिम बंगालमध्ये बीफ आणि डुकराच्या मटणाची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे झोमॅटोवर कर्मचारी नाराज झाले आहेत. या कर्मचार्‍यांचा आरोप आहे, की कंपनी त्यांना धर्माविरोधात असलेल्या गोष्टी डिलिव्हरी करायला सांगत आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावत आहेत. या कर्मचार्‍यांकडून झोमॅटो बीफ, डुकराच्या मांसाचे पदार्थ जबरदस्तीने डिलिव्हर करण्यास भाग पाडत आहे. कंपनी कर्मचार्‍यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही. त्याविरोधत गेल्या आठवड्यापासून आंदोलन छेडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार झोमॅटोच्या कर्मचार्‍यांच्या दोन मागण्या आहेत. कंपनीने कर्मचार्‍यांच्या धार्मिक भावनांशी कोणत्याही प्रकारचा खेळ करू नये, अशी एक मागणी आहे, तर दुसरी पगारवाढीची आहे. याबाबत कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकड दाद मागितली; परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे या आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात 31 जुलैला डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्याने ऑर्डर रद्द करणार्‍या ग्राहकाला झोमॅटोने सणसणीत प्रत्युत्तर दिले होते. विशेष म्हणजे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीही ट्विट करत आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. आम्ही व्यवसाय करताना मूल्ये पाळतो, अशी भावना त्यांनी ट्विटमधून व्यक्त केली होती. अमित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत आपण झोमॅटोवरून केलेली ऑर्डर रद्द केल्याचे म्हटले होते. झोमॅटोने माझ्या ऑर्डरची जबाबदारी हिंदू नसलेल्या रायडरकडे दिली. रायडर बदलणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मी ऑर्डर रद्द केल्यास भरलेले पैसे परत मिळणार नाहीत, असे ते म्हणाले. हाच डिलीव्हरी बॉय तुमच्याकडे जेवण घेऊन येईल, अशी सक्ती तुम्ही मला करू शकत नाही, असे शुक्ल यांनी नमूद करून तुम्ही पैसे परत करू नका; पण ऑर्डर रद्द करा, असे ट्विट शुक्ला यांनी केले होते. त्यानंतर झोमॅटोवर नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला होता.