Breaking News

खुमखुमी असेल तर सीमेवर या, धडा शिकवू


लष्करप्रमुख रावत यांचा इशारा; काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात


नवी दिल्ली
पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर येण्याची खुमखुमी असेल, तर त्यांनी जरूर यावे. त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवू, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला.

भारताने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या निर्णयाने खळबळ माजली आहे. आता नियंत्रण रेषेवर पाककडून आगळीक केली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान लडाखच्या जवळ स्कर्डू एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करत आहे. पाकच्या या प्रकारानंतर भारताच्या लष्कर प्रमुखांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. रावत यांनी म्हटले आहे, की भारतीय लष्कर सावध आहे. काश्मिरी लोकांसोबत आमचा पहिल्यासारखाच संवाद सुरू आहे. आम्ही त्यांची कोणत्याही शस्त्राशिवाय भेट घेत आहोत आणि भेटत राहू.

पाकिस्तानचे भारतातले माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारताने हद्द पार केली, तर पाकिस्तानला युद्धाशिवाय पर्याय नाही, अशी वल्गनाही बासित यांनी केली आहे. या आधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. बासित म्हणाले, की पहिला पर्याय म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सने सर्वोच्च न्यायालयात लढाई लढावी, दुसरा पर्याय म्हणजे पाकिस्तानने राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर विषय मांडावा. भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवावा आणि हे सगळे यशस्वी झाले, नाही तर युद्ध करण्यास मागेपुढे पाहू नये.

पाकच्या हालचालीवर करडी नजर
केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाही देशाने पाठिंबा दिला नाही. भारतीय सुरक्षा संस्था आणि गुप्तचर यंत्रणांची पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर असून लष्कर आणि हवाई दलाला अलर्ट करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.