Breaking News

प्लॅस्टिक सर्जरी शिबिरात ७३ रुग्णांवर शस्त्रक्रिया

संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर मधील मालपाणी हॉस्पिटल व अग्रवाल क्लब पुणे यांनी १० व ११ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात ७३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांमुळे जन्मजात व्यंग तसेच अन्य काही कारणाने निर्माण झालेली शारीरिक विकृती यातून रुग्ण मुक्त झाली.

 मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्येच होऊ शकणार्‍या, मात्र खर्चाच्या दृष्टीने सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आव्हानात्मक शस्त्रक्रियाही या शिबिरात झाल्याने त्या रुग्णांना नवसंजीवनी मिळाल्याचा आनंद झाला. या सर्वांना मालपाणी हॉस्पिटलच्या वतीने औषधे विनामूल्य देण्यात आली. संगमनेर, अकोले, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, नगर येथून आलेल्या रुग्णांच्या निवासाची आणि चहा, नाश्ता- भोजनाची सोय दोन दिवस करण्यात आली होती.

   डॉ.जिंदल यांच्या नेतृत्वाखाली डॉ.शंकर सुब्रमण्यम, डॉ.अविनाश येलीकर डॉ.स्वप्ना आठवले, डॉ. मौलिक जरीवाला,  डॉ.तन्वी तोतला, डॉ.विजय अग्रवाल, डॉ.राजेश गोरे, डॉ.रुपाली शिंदे, डॉ.शरण बसप्पा, डॉ.नॉव्हेल फिलीप ब्रीटो यांच्या पथकाने दोन दिवस २२ तासात मालपाणी हॉस्पिटलच्या चार अत्याधुनिक मोड्यूलर ऑपरेशन थिएटर्स मध्ये या शस्त्रक्रिया केल्या. त्यांना मालपाणी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.जितेश चुडीवाल यांच्यासह डॉ. दीपक तांबे, डॉ.अभिजित पावसे, डॉ.उदय जोशी, डॉ.अमित केसकर आणि अन्य सहकार्‍यांनी सहकार्य केले. राजेश मालपाणी, डॉ.संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी यांनी दोन्ही दिवस शिबीरस्थळी उपस्थित राहून रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. अग्रवाल क्लबचे अध्यक्ष अमिताभ अग्रवाल, उमेश जालान, माखन अग्रवाल, राजीव अग्रवाल, रामेश्‍वर अग्रवाल, राजेश गुप्ता, दीपक गुप्ता आदींनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन व मदत केली.