Breaking News

गोंधळ टाळण्यासाठी कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश लागू

कोल्हापूर / प्रतिनिधी
गेल्या सहा दिवसांपासून महापुरामुळे बेहाल झालेल्या कोल्हापुरात सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्याने आता कोल्हापूरमधील पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात होणार आहे; मात्र कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस आणि धरणातून होणार्‍या पाण्याच्या प्रचंड विसर्गामुळे तब्बल सहा दिवस सांगली आणि कोल्हापूरला पाण्याचा वेढा पडला होता. त्यामुळे नागरिकांची घरे पाण्याखील जाऊन हजारो कुटुंबे विस्थापित झाली होती. राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगलीच्या दिशेने मदतीचा ओघ सुरू झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये याठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते याठिकाणी कार्यरत आहेत.
पूर ओसरल्यानंतर याठिकाणी रोगराई आटोक्यात ठेवणे आणि पूरग्रस्तांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवणे, याला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येईल. या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून जमावबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. तत्पूर्वी कोल्हापूर शहरातील पाणी टप्प्याटप्प्याने ओसरायला सुरुवात झाली होती.
गेल्या सात दिवस बंद असलेल्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवार सकाळपासून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे पंचगंगेच्या पुलाच्या अलीकडे महामार्ग पाण्याखाली गेल्याने सात दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र तूर्तास अत्यावश्यक सेवांसाठीच ही वाहतूक सुरू आहे.