Breaking News

पूरग्रस्तांना शक्यतो रोखीने मदत

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; 154 कोटींचा निधी


सांगली  / प्रतिनिधी
दोन दिवस पाण्यात असेल, तर मदत यासंबंधीच्या जीआरचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी सांगलीमध्ये जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना जीआर संदर्भात प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर पूरग्रस्त असाल, तर दोन दिवस पाण्यात राहण्याची अट नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारी अध्यादेशावरून उडालेल्या गोंधळाबाबत आणि त्यावर होत असलेल्या टीकेबाबत फडणवीस म्हणाले, की महापुराच्या वेळी घरे सात दिवस पाण्यात असतील, तर मदत देण्याची अट होती. आताच्या सरकारच्या काळात घरे दोन दिवस पाण्यात बुडाली, तरच अन्नधान्य मोफत दिले जाईल, अशा आशयाचा जीआर सरकारने काढला; मात्र या जीआरचा अर्थ चुकीचा काढण्यात आला. सरकारने मदतीची रक्कम बँकात जमा करण्याचे जाहीर केले होते. बँकांत महापुराचे पाणी गेले आहे. त्यांच्या यंत्रणा कधी सुरू होतील, याचा नेम नव्हता. बँकांपर्यंत जाण्याचे बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. अशा स्थितीत मदत मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नव्हते. त्यामुळे ही सरकारच्या निर्णयावर टीका होत होती.
या पार्श्‍वभूमीवर आता शक्य आहे तिथे रोखीनेच मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी 154 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते; मात्र आता शक्य आहे तिथे रोखीनेच मदत केली जाणार आहे. शनिवारी सांगलीमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजकारण नको, उणिवा दाखवा
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणार्‍या मदतीची माहिती दिली. विरोधकांनी राजकारण करू नये उणिवा जरूर दाखवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.