Breaking News

शहरातील मिरवणुकांवर 191 सीसीटीव्हींची नजर

अहमदनगर/प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीनिमित्त गुरूवारी (दि.12) घरगुतीसह सार्वजनिक मंडळांचे गणेश विसर्जन होणार आहे. जिल्हा पोलिस दलाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या निघणार्‍या मिरवणुकांच्या बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे. विशेष करून नगर शहरातील सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीवर लक्षकेंद्रीत करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त असून, त्यात शहरासाठी 550 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त असणार आहे. शहरातील विसर्जन मार्गावर पोलिसांच्या बंदोबस्ताबरोबर 191 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे.
जिल्ह्यात 2 हजार 682 सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात 381 गावांनी ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना केली आहे. नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत 205, तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत 172 आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत 79 सार्वजनिक मंडळे आहेत. शहरातील मानाच्या विशाल गणपतीची उत्थापन पूजा सकाळी 8 वाजता होणार आहे. त्यानंतर 11 वाजता रामचंद्र खुंट येथून विसर्जन मिरवणुकींला सुरूवात होईल. यानंतर दुपारी 3 नंतर सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका निघतील. नगर शहर, सावेडी आणि केडगावमधील सार्वजनिक मंडळांच्या स्वतंत्र मिरवणुका निघणार आहे. त्यासाठी विसर्जन मार्गावर शहरात 550 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरातील विसर्जन मार्गावर 191 सीसीटीव्ही कॅमेरे मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. स्थानिक पोलिसांनी देखील मिरवणुकीच्या चित्रीकरणासाठी स्वतंत्र कॅमेरे लावले आहेत.
शहरासह जिल्ह्यासाठी असलेले पोलिस बंदोबस्त पुढीलप्रमाणे ः पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दोन, उपअधीक्षक 12, निरीक्षक 31, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक 100, गृहरक्षक दलाचे जवान 450, शहरात सीआरपीएफची एक तुकडी, वाहन 60, कॅमेरे व्हॅन 2, पोलिसांचे मॅन्युअल कॅमेरे सुमारे 35, सीसीटीव्ही 505.बंदोबस्तावरील अनेक पोलिस आजारांनी ग्रस्त गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येणार आहे. यामुळ जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्याबाहेर पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. मुंबई पोलिस देखील बंदोबस्ताला आहे. गेल्या चार दिवसांपासूनचा बंदोबस्त आणि व्हायरल इन्फेक्शनला पोषक अशा वातावरणामुळे बंदोबस्तावरील अनेक पोलिस आजारी पडले आहेत.