Breaking News

राफेल नदालने जिंकजे 19 वे ‘ग्रँडस्लॅम’

रशियाच्या मेद्वेदेवचा कडवा प्रतिकार काढला मोडून ; चौथ्यांदा जिंकली यूएस ओपन स्पर्धा

न्यूयॉर्क
टेनिस जगतात अजुन तरी फेडरर-नदाल-जोकोवीच या त्रिकुटाशिवाय ग्रँड स्लम स्पर्धा जिंकू शकणारे दुसरे कुणी नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या डनिएल मेद्वेदेवला रविवारी रात्री मात देत युएस ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. तब्बल चार तास 49 मिनिटे रंगलेला हा विलक्षण चढउतारांचा अंतिम सामना राफेल नदालने 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा जिंकला.
यात शेवटच्या सेटमध्ये मेद्वेदेवने दोन मच पॉईंट वाचवले पण आपला पराभव तो टाळू शकला नाही परंतू पहिले दोन्ही सेट गमावल्यावरसुध्दा त्याने राफेल नदालसमोर सहजासहजी हार न मानता सामना पाचव्या सेटपर्यंत लांबवला. 23 वर्षीय मेद्वेदव हा प्रथमच ग्रँड स्लम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. राफेल नदालच्या कारकिर्दीतील हे 19 वे ग्रँड स्लम विजेतेपद असून यूएस ओपनची ट्रॉफी त्याने चौथ्यांदा उंचावली आहे. पूर्ण कस लागलेल्या या सामन्यातील विजयानंतर नदाल म्हणाला की, हा सामना अतिशय कठीण बनत गेला म्हणून हा विजय माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी संयम राखू शकलो म्हणून जिंकलो पण हा विलक्षण सामना होता म्हणूनच मी या विजयाने भावूक झालो. डनियलने ज्या पध्दतीने प्रतिकार केला आणि खेळाची लय बदलवली ते आश्‍चर्यकारक होते. भविष्यात तो अधिक यश मिळवले याचा मला विश्‍वास आहे. या विजेतेपदासह नदाल फेडररच्या 20 ग्रँड स्लम विजेतेपदांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहचला असून 19 विजेतेपदांसह तो दुसर्‍या स्थानी आहे. तिसर्‍या स्थानावरील नोव्हाक जोकोवीचची 16 ग्रँड-स्लम विजेतेपदं आहेत. गेल्या पाच स्पर्धात नदालने 26 सामने जिंकताना फक्त एकच सामना गमावलाय. यात रोम व फ्रेंच ओपनच्या विजेतेपदाचा समावेश आहे. मेद्वेदेवविरुध्दच्या या आधीच्या एकमेव सामन्यातही नदालच जिंकला होता आणि माँट्रियाल येथील त्या विजयाने त्याला रॉजर्स कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. सामन्यातील शेवटचे तीन तास कठोर परीक्षा घेणारे होते. मानसिक व शारीरिकदृष्ट्यासुध्दा अतिशय कठीण सामना होता. अशा स्थितीत पाठिराख्या प्रेक्षकांमुळे हा सामना सूपर स्पेशल बनला. डनिएलने तो रंगतदार बनवला. त्याचा खेळ एका चम्पियन सारखा आहे. त्याला यशाच्या भरपूर संधी आहेत, असे नदालने आपल्या तरूण प्रतिस्पर्ध्याच्या कौतुकात म्हटले आहे. नदालने यंदा ऑस्ट्रेलियन ओपनचीसुध्दा अंतिम फेरी गाठली होती. फ्रेंच ओपनमध्ये तो विजेता होता आणि विम्बल्डनच्याही उपांत्य फेरीत पोहचला होता. यामुळे जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानासह वर्षाला निरोप देण्याची त्याला संधी आहे. यूएस ओपनच्या विजेतेपदांबाबत तो आता जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर, पीट सम्प्रास या प्रत्येकी पाच वेळच्या विजेत्यांनंतर दुसर्‍या स्थानी आहे. नदालचे वय सध्या 33 वर्षे आहे आणि वयाची तिशी ओलांडल्यावर त्याचे हे पाचवे ग्रँड-स्लम विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये नेटजवळून प्रभावी खेळ करताना त्याने तासाभरात पहिला सेट जिंकला. तिसर्‍या सेटमध्येही तो एका ब्रेकसह 3-2 अशा आघाडीवर होता. त्यावेळी मेद्वेदेवने सामन्यात मुसंडी मारली. त्याने नदालची सर्व्हिस भेदली आणि फोरहँडसह तो आक्रमक खेळू लागला. यासह त्याने सरळ सेटमध्ये संपेल असे वाटणारा सामना पाचव्या सेटपर्यंत लांबवला. शेवटच्या सेटमध्ये 5-2 अशा आघाडीसह नदाल विजयासाठी सर्व्हिस करत असतानाही मेद्वेदेवनने प्रतिकार सोडला नाही आणि दोन मचपॉईंट वाचवत स्कोअर 4-5 असा केला पण तिसर्‍या मचपॉईंटवर नदालने संधी सोडली नाही. मरात साफिन नंतर ग्रँड स्लम स्पर्धा जिंकणारा पहिला रशियन टेनिसपटू बनण्याची मेद्वेदेवला संधी होती. साफिनने 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. यंदा सर्वाधिक 50 विजय त्याच्या नावावर होते. या सामन्यानंतर मेद्वेदेव म्हणाला की मी हा दिवस कधीच विसरू शकत नाही. राफानेसुध्दा 19 ग्रँड-स्लम स्पर्धा जिंकल्या असल्या तरी तो पहिले विजेतेपद विसरला नसेल. तो जिंकला आणि मी हरलो असलो तरी हा सामना भन्नाट झाला. यंदाचा सिझनच माझ्यासाठी चांगला गेला.