Breaking News

वाहन विक्रीतला 21 वर्षांचा नीचांक

नवीदिल्ली
भारतीय वाहन उद्योगावरील विघ्न दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. ऑगस्ट महिन्यातील प्रवासी वाहन विक्रीची आकडेवारी समोर आली असून, 1998 नंतर प्रथमच वाहन विक्रीने नीचांक गाठला आहे. सलग दहा महिन्यांपासून ही घट होत आहे. वाहन उत्पादक क्षेत्रातील ‘सियाम’ने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स) ही माहिती जारी केली आहे.

जीएसटी, विक्रीतील घसरण आणि रोजगार कपातीचा सामना करावा लागलेल्या देशातील वाहन उद्योगांवर ग्राहकांकडून होणार्‍या खरेदीअभावी निर्मिती कमी करण्याची वेळही ओढवली आहे; मात्र विक्री वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहन उद्योगासमोरील समस्या वाढतच चालली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीचा अहवाल ‘सियाम’ने आज प्रसिद्ध केला. 1997-98 पासून वाहन विक्रीची आकडेवारी संग्रहीत करण्याचे काम सुरू केले होते. तेव्हापासून प्रथमच वाहन विक्री नीचांकी पातळीवर गेली आहे. प्रवासी वाहनांची विक्री 31 टक्क्यांनी घटली असून, वर्षाला एक लाख 96 हजार 524 युनिट (गाडी) विक्रीअभावी पडून आहे, तर प्रवासी कारची विक्री 41.09 टक्क्यांनी घटली आहे, असे ‘सियाम’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

ही आकेडवारी प्रकाशित होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जुलैदरम्यान प्रवासी गटातील वाहनांची निर्मिती 13.18 टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘सिआम’ने म्हटले होते. चार महिन्यांत केवळ ह्युंदाई मोटर इंडिया, फोक्सवॅगनसारख्या निवडक कंपन्यांच्या वाहन निर्मितीत वाढ नोंदली गेली आहे. मारुती सुझुकी, होंडा कार्स इंडिया, फोर्ड, टोयोटा किर्लोस्कर महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स यांना तब्बल 30 टक्क्यांपर्यंतच्या घसरणीला सामोरे जावे लागले, असे ‘सियाम’ने नमूद केले होते.

जीएसटीत समानता आणण्याची मागणी
दरम्यान, आगामी जीएसटी परिषदेची बैठक ही 20 सप्टेंबरला गोवा येथे होणार आहे. वाहनांसाठी लागणार्‍या विविध सुटया घटकांपैकी 60 टक्के घटकांवर 18 टक्के दराने जीएसटी, तर उर्वरित 40 टक्के महागडया घटकांवर 28 टक्के दराने जीएसटी आकारला जातो. ही असमानता दूर करून सरसकट एकसमान दर लागू करावा, अशी मागणी ‘अ‍ॅक्मा’ने गेल्या आठवड्यात झालेल्या वार्षिक संमेलनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.