Breaking News

‘सृजन’च्या नोकरी मेळाव्यात एक हजार युवकांची निवड

 कर्जत/प्रतिनिधी
 कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाउंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1 हजार 147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या. हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही नोकरीसाठी शिबीरे व मेळावे घेणार असल्याचे सांगत ही अखंड प्रक्रिया सुरू राहील असे आश्‍वासन आयोजक रोहित पवार यांनी युवक-युवतींना दिले.
 कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या थेट नोकरी मेळाव्यात राज्यभरातील वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागही झाल्या होत्या. तर पाच हजार 70 उमेदवार या मेळाव्यासाठी येथे आले होते. गर्दीचा प्रतिसाद या मेळाव्यात मोठा मिळाल्याने रोहित पवार यांनी नोकरी मिळण्याबाबतची संख्या मोठी असल्याने यापुढील काळातही वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधून या दोन तालुक्यात ही प्रक्रिया सातत्याने राबविण्याचा निर्णय घेतला. आज सहभागी झालेल्या कंपन्यांच्या मार्फत यापुढील काळातही  कर्मचार्‍यांची भरती या परिसरातूनच होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्याचबरोबर येणार्‍या काळामध्ये कर्जत व जामखेड परिसरातील तरुण व तरुणींसाठी या ठिकाणीच करियर प्लॅनिंग शिबिरही होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
 यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, या शिबीरातून काही तरुण-तरुणींना नोकरी मिळेल, काहींना नोकरी मिळाली नसली तरी निराश होऊ नका. ही प्रक्रिया कायम राबविणार आहोत. रोजगार मेळाव्यात सर्वांनाच एकावेळी नोकरी मिळणार नाहीत. आपण प्रयत्न करीत राहू. सामान्य कुटुंबामधून शिक्षण घेत असताना मुलांना व मुलींना अनेक अडचणी येत असतात. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेकांना आपले शिक्षण मधूनच थांबवावे लागते. यामध्ये काहींचे पाचवी तर काहींचे दहावीपर्यंतचे शिक्षण होते. एवढ्या शिक्षणावरती नोकरी मिळवणे कठीण असते. परंतु वेगवेगळ्या स्तरावरील कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्येक युवक युवतींना ज्यांच्या- त्यांच्या शिक्षणा प्रमाणे नोकरीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. येत्या काळातही कर्जत परिसरातील सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना विविध ठिकाणी नोकर्‍या मिळवून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणार आहोत.
 यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संजय तोरडमल, बाळासाहेब साळुंके, मधुकर राळेभात यांची भाषणे झाली. यावेळी काकासाहेब तापकीर, किरण पाटील, देवीदास गोडसे, चंद्रकांत राळेभात, अभिजीत तांबिले, सुभाष गुळवे, तात्या ढेरे, संजय वराट, अमित जाधव, वसंत कांबळे, सचीन सोनमाळी, नितीन धांडे, शरद शिंदे, रघुनाथ काळदाते, स्वप्निल तनपुरे, अशोक जायभाय, ऋषिकेश धांडे, सुनील शेलार उपस्थित होते.