Breaking News

मंगल कार्यालये बनताहेत राजकीय प्रचाराचे केंद्र

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी
 राज्यात विधानसभेची वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. पक्षांतर करणारे सगळ्याच निष्ठा, आदर्श वारसा, सामाजिक कार्ये,  बाजूला ठेवून पक्षांतर करण्यात मश्गुल झालेले आहेत. स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचे केविलवाणी धडपड राजकीय पटलावर पहावयास मिळत आहे. या सर्व गोष्टींचे साक्षीदार मंगल कार्यालये ठरत आहेत. पूर्वी मंगल कार्यालयांचा वापर हा दोन नात्यांच्या अतुट बंधानासाठी केला जायचा. या कार्यलयामध्ये वाजणारा मंगल ध्वनी हा त्या मंगल कार्यांची आठवण करून देत होता. परंतु आज मात्र, हाच वापर अनेक नवनवीन गाठी मारण्यासाठी केला जात आहे. त्या गाठी जन्मा-जन्मीच्या होत्या. ह्या मात्र, बांधतानाच जिथे जातो तेथे तु माझा सांगाती. असे सांगणार्‍या असतात. हे सध्या गल्ली पासून दिल्ली पर्यत पहावयास मिळत आहे. 
  आता एकमेकांवरील दोषारोप बदलती निष्ठा, माझ्या गळा तुझ्या गळा, नाही जमले तर पाहीन तुझ्या हिरवा मळा परतीचा मार्ग माझ्यासाठी सदैव मोकळा... मंगल कार्यालयामध्ये सभा आणि मेळावे, यांची गंमत फार मोठी आहे. कार्यकर्ते आणि मतदार जमले तर सभा मोठी! नाहीतर सभेचा फज्जा उडतो. हेही या नवीन निष्ठावंत नेत्यांच्या लक्षात येते. गर्दी कमी झाली तर बसण्यासाठी खुर्च्या अन्यथा गर्दी वाढली तर गादी, चटाया हा फॉर्मुला मंगल कार्यालातील मंगल ध्वनी दुषित करताना दिसत आहे. पहिल्या पारावरच्या सभा, त्या सभेतील शब्द नेते पाळत असायचे. कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द कार्यकर्तेही तेवढ्याच ताकदीने सांभाळायचे. हा फंडा आता कमी होताना दिसत आहे. मंगल कार्यालयातील जेवणावळी मात्र, कार्यक्रमाची उंची वाढवतात. त्यामध्ये राजकीय कार्यकर्त्यांची व पुढार्‍याची मंगल कार्यालये यांना सध्या सुगीचे दिवस आलेले आहेत. मात्र, शब्दांमधली धार व निष्ठा इथे कमी पहावयास मिळत आहे. कालपरवा दुसर्‍या पक्षामध्ये पद भोगलेली माणसे आज तिसर्‍याच पक्षात जीवाचे रान करून नेत्याला आळवण्याचा केविलवाणा प्रकार हा लोकशाहीच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतो की काय? असा प्रश्‍न सध्या पडत आहे. मात्र, अशा उतावळ्या व उचल्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर नेत्यांनी निवडणुका लढूच नयेत. कारण येणारा काळ हा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. मी आणि मी असे म्हणणार्‍या कार्यकर्त्यांची आचारसंहिता तपासूनच नेत्यांनी निर्णय घेणे उचित ठरणार आहे. सध्या निष्ठा या शब्दाला तिलांजली देऊन अनेकांनी स्वार्थासाठी घरोबा करणार्‍यांची संख्या बळावत आहे. त्यातच गावकुसाबाहेर गेलेल्या सभा आणि मेळावे हे मंगल कार्यालयाची शोभा वाढवतात. मात्र, जनतेचा अंदाज बांधण्यात चुकत असल्याचे येणार्‍या काळात नेत्याच्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याची ताराबंळ उडवणारा ठरणार आहे. ज्यांना ग्रामपंचायतमध्ये आस्थित्व निर्माण करता आले नाही असे कार्यकर्त्ये तालुक्याचा अंदाज बांधतात. त्यामुळेच नेत्याला पराभवाला सामोरे जावे लागते. हा पराभव म्हणजे जनतेतल्या व सार्वजनिक असणार्‍या सभाचार भिंतित आल्यामुळे होत आहे काय ? असा प्रश्‍न सध्या चर्चेला मुद्दा उपस्थित करणारा ठरत आहे. मंगल कार्यालयातील सभा ह्या जनतेच्या भरवशावर व्हाव्यात तेव्हा मंगल व आनंदायी होतील. तेव्हाच मंगल कार्यालयातील होणार्‍या सभा लोकशाहीची मान उंचवणार्‍या व पोषक ठरतील, यात मात्र शंका नाही.