Breaking News

भाजपत येणारे साधू, संत नाहीत

खडसे यांची टीका; सत्तेच्या उबेसाठी भाजपकडे ओघ

जळगाव / प्रतिनिधी
भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधू, संत नाहीत. सत्तेची ऊब हवीय म्हणूनच हे सर्व नेते भाजपत येत असल्याची टीका भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात, असा टोला खडसे यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षात नारायण राणेंच्या पक्षप्रवेशाबाबत खडसे म्हणाले, की राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असे अनेक वर्षांपासून ऐकतो आहे. प्रत्येक पक्षाने कोणाला पक्षात घ्यावे, हा अधिकार त्या पक्षाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दबावात घेऊ नये. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा फायदा होईल. युती होईल अशी आशा आहे; मात्र 50-50 चा फॉर्मुला ठरलेला नाही, ते वरिष्ठ सांगतील, असे खडसे यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना ‘क्लीन चिट’ दिली जाते. त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात; मात्र भाजपमध्ये येणारे साधू, संत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगले येत आहेत. भाजपची नीतीमूल्ये मान्य म्हणून सर्व येत आहेत असे नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावे लागते; मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकत, असे खडसे यांनी म्हटले आहे.