Breaking News

इस्रोच्या कामगिरीवर चीनची स्तुतीसुमने

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
चांद्रयान 2 संदर्भात इस्रोच्या कामगिरीवर आणि यशावर संपूर्ण जगाने कौतुक केले. चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा करत आपलं कार्य अशाच रितीनं सुरू ठेवावं अशा शुभेच्छा दिल्या आहेत. चीनच्या ग्लोबल टाईम्सने एका युझरला कोट करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल तर त्याचा आम्ही सन्मान करतो. तसंच चांद्रयानाच्या अॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (ACT) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचेही ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

  चीनच्या शास्त्रज्ञांनुसार विक्रम लँडरमध्ये 50 न्यूटनचे 8 थ्रस्टर लावण्यात आले होते. त्यांना नियंत्रित करणे कठिण असल्याचे त्यांनी सांगितले. चीनच्या चँग ई 3 मध्ये 28 थ्रस्टर लावण्यात आले होते. 2013 मध्ये चीनने हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सोडले होते. त्यानंतर चँग ई 4 देखील 2013 मध्ये चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सोडण्यात आले होते. 800 न्यूटनच्या इंजिननेही सॉफिट लँडिंग शक्य नाही. यासाठी 1 हजार 500 ते 7 हजार 500 न्यूटनच्या इंजिनची गरज असते, असंही त्यांनी नमूद केलं आहे. यापूर्वी नासाकडूनही इस्रोची प्रशंसा करण्यात आली होती. तसंच संयुक्त अरब अमिराती, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन संस्थांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली होती.

 चांद्रयान-2 मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु त्यानंतर इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली होती. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही. हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत. फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आली आहे.