Breaking News

भाजप खासदार अर्जुन सिंहाच्या गाडीवर हल्ला; तृणमूलवर आरोप

कोलकात्ता
पश्‍चिम बंगालमधील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांच्या गाडीवर रविवारी हल्ला झाला. त्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात थोडफोड करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाचा ताबा घेऊ इच्छित होते, असा आरोप अर्जुन सिंह यांनी केला आहे.

खा. सिंह यांनी म्हटले आहे, की माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा लोक शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होते; मात्र पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी माझ्या डोक्यावर लाठीमार केला व माझ्याशी असभ्य भाषा वापरत वर्तवणूक केली. शिवाय माझ्या घरावरही हल्ला केला आहे. ही घटना पश्‍चिम बंगालच्या नॉर्थ 24 परगणा येथील आहे. सिंह श्यामनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यादरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाहनाची थोडफोड केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्जुन सिंह हे पश्‍चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांच्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडूनही करण्यात आलेला आहे.