Breaking News

चीनची अरुणाचल प्रदेशात घुसखोरी?

नदीवर लाकडी पूल बांधल्याचा भाजप नेत्याचा दावा

इटानगर
चीनकडून अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चीनच्या लष्कराकडून लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोलपासून (एलएसी) भारतीय हद्दीत 100 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याचा दावा अरुणाचल प्रदेश भाजप अध्यक्ष आणि अरुणाचल पूर्वचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे.

गाओ यांनी म्हटले आहे, की चीनच्या लष्कराकडून अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील चागलागम गावाजवळून वाहणार्‍या एका नदीवर लाकडी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पूलाच्या बांधकाचा व्हिडिओ भाजपच्या कार्यकर्त्यांनी चित्रीत केला आहे. भाजप कार्यकर्ते ऑगस्ट महिन्यांत या भागात शिकारीसाठी गेलेले असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. गाओ यांच्या दाव्याला उत्तर देताना भारतीय लष्कराने म्हटले आहे, की आम्ही ही घटना तपासून पाहत आहोत; मात्र या हालचालींवरून असे वाटते, की हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे गस्ती पथक असावे. ऑक्टोबर 2018 मध्ये चीनच्या लष्कराने याच ठिकाणी घुसखोरी केली होती. तसेच त्यांनी येथे तात्पुरते तंबूही टाकले होते. याची माहिती तिथल्या स्थानिक शिकार्‍यांनी दिली होती. यावर अद्याप संरक्षण खात्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. चीनच्या सैन्याने हा भाग सोडला आहे, की नाही याबाबतही अद्यापपर्यंत कुठलीही माहिती मिळाली नाही.

यापूर्वी 2017 मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. भूतान आणि चीन यांच्यामधील वादग्रस्त भाग असलेल्या डोकलाम पठारावर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून सुरू असलेले रस्त्याचे काम भारतीय जवानांनी थांबवले होते. चीन आणि भारतादरम्यान जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोल (एलएसी) आखण्यात आली आहे.

गेल्या वर्षीही घुसखोरी
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तुकड्यांनी गेल्यावर्षी अप्पर दिबांग व्हॅलीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी इथल्या गावांतील काही आदिवासींना येथे 11 शस्त्रधारी सैनिक दिसले होते. त्यांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींचे काही फोटोही घेतले होते. याची माहिती त्यांनी भारतीय लष्कराला आणि स्थानिक प्रशासनालाही दिली होती.