Breaking News

हर्षवर्धन पाटील भाजपत जाण्याच्या तयारीत

विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतली भेट; लवकरच निर्णय

सोलापूर / प्रतिनिधी
पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज (बुधवार) अकलूज येथे जाऊन मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. दोघांत एक तास गुप्त चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली होती; मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जिंकलेली जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे पाटील भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी अकलूजला येऊन विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो, असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले आहेत. पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा बोलविला असून त्याच ते निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते -पाटील यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तर थेट भाजपमध्येच प्रवेश केला. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी मोहिते पाटील प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करीत भाजपत जाणार
हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते जागावाटपातील नाराजी बोलवून दाखवत भाजप प्रवेशाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.