Breaking News

गायी जन्माला घालण्याचा कारखाना टाकू

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य; झुंडबळीवरचा उपाय

नागपूर / प्रतिनिधी
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेच राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा ‘गाय आणि झुंडबळी’संदर्भात वक्तव्य करत वाद ओढवून घेतला आहे. ‘येणार्‍या काळात आम्ही गाय जन्माला घालणारा कारखाना टाकू. येत्या काळात तंज्ञज्ञानाच्या माध्यमातून केवळ मादी गाय जन्माला येईल. त्यामुळे मॉब लिंचिंग सारख्या घटनाही थांबतील आणि त्याचा शेतकर्‍यांनाही फायदा होईल’, असे मत सिंह यांनी व्यक्त केले आहे.

ते नागपूर येथे मदर डेअरी कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, की विदर्भातील गायी लहान असतात. त्या फक्त दोन लीटर दूध देतात. मी या आधीही सांगितले, की येणार्‍या काळात देशात ज्या काही गायीच्या गर्भधारणा होतील, ते गर्भ मादी असतील. अशा गर्भधारणा सॉर्टिंग सेक्स सीमनच्या तंत्रज्ञानाद्वारे शक्य होणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे विदर्भातील युवकांनाही याचा फायदा होईल. या वर्षी आमचे लक्ष्य 30 लाख गायी जन्माला घालण्याचे आहे. 2025 सालापर्यंत 10 कोटी मादी गायी जन्माला येतील.
या वेळी बोलताना त्यांनी आम्ही गायी जन्माला घालणारा कारखाना टाकू. सरोगेट मातेवर एम्बियो ट्रान्सप्लांटमध्ये आणखी विकसित केल्यानंतर दूध न देणार्‍या गायींमध्येही 20 लीटर दूध देण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे, असे स्पष्ट केले. जगभरातील दुधाच्या किंमतींच्या तुलनेत येत्या काळात भारतात दूधाची किंमत कमी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.