Breaking News

अंगणवाडी सेविकांना 'कायम' करण्यासाठी प्रयत्नशील बॅनर

मंत्री विखे: आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्काराचे वितरण


प्रवरानगर /प्रतिनिधी

 राज्याला कुपोषणमुक्त करण्यात अंगणवाडी सेविकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. बालमृत्यूचे  प्रमाण कमी करतानाच 'बेटी बचाव आणि बेटी पढाव' या प्रधानमंत्र्याच्या विचारांची अंगणवाडी सेविका करीत असलेली यशस्वी अंमलबजावणी ममत्वाच्या भावननेची आहे. आवाहनात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी शासन स्तरावर निश्चित पाठपुरावा करू आशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 राहाता पंचायत समिती व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या वतीने तालुक्यातील 'आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार २०१९-२०'चे वितरण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरानगर येथील कामगार सांस्कृतिक भवनात झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी .विखे पाटील यांनी अंगणवाडी सेविकांसाठी स्व.सिंधूताई विखे पाटील पुरस्कार दरवर्षी देण्याची घोषणा केली. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जी.प. सदस्य रोहिणी निघुते आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

   या वेळी तालुक्यातील १२ अंगणवाड्यांमधील ३६ सेविका आणि ३६ मदतनिसांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम ३ हजार, द्वितीय २ हजार आणि तृतिय १ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच मतिमंद मुलांच्या औषधोपचारासाठी प्रत्येकी २० हजार प्रमाणे १६ पालकांना अर्थसहाय्य देण्यात आले. तर ३६ अपंग मुलांच्या पालकांनाही तेवढीच अर्थसहाय्याची रक्कमेचे धनादेश प्रदान करण्यात आले.

  यावेळी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजने अंतर्गत तालुकास्तरावर निवड झालेल्या बचत गटांना प्रत्येकी ५२ हजार ५०० रुपयाचे बक्षीस वितरित करण्यात आले. यामध्ये साई द्वारकामाई बचतगट लोहगाव, साईश्रमिक बचत गट लोणी बुद्रुक ,तेजस्विनी महिला बचतगट कोऱ्हाळे,ईश्वरी महिला बचतगट बाभळेश्वर,जान्हवी महिला बचतगट ,क्रांती महिला बचतगट,शैल्यम महिला बचतगट, त्रिमुर्ती महिला बचत गट आणि स्वामीसमर्थ महिला बचतगट,लोणी खुर्द यांचा समावेश होता. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत वाकडी येथील आर्वी एलम आणि नांदूर येथील श्रेया एलम यांनाही बक्षीस देण्यात आले.