Breaking News

गॅस प्रकल्पाला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू

दोन तासांत आग आटोक्यात; मृतांत अग्नीशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश

मुंबई / प्रतिनिधी
उरणमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कंपनी (ओएनजीसी) च्या प्रकल्पाला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याचे समजते.
सकाळी सातच्या सुमाराला ही आग लागली. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे. आग लागली, तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथे मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. या आगीमुळे परिसरात घबराट पसरली असून आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत. आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते; परंतु सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
गेल्याच महिन्यात या प्रकल्पात स्फोट होऊन आग लागली होती. हा प्रकल्प मोठा आणि जुना असून आतील सामुग्रीही जुनी झालेली आहे. त्यामुळे या प्रकल्पात गळतीचा धोका नेहमीच राहिलेला आहे. या आगीमुळे पुन्हा एकदा या प्रकल्पाचा, कामगारांचा आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
उरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पाला लागलेल्या भीषण आगीमुळे सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार असून, याचा फटका रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील वडाळा येथीसल एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे महानगर गॅस कंपनीने(एमजीएल) म्हटले आहे. स्थानिक पीएनजी ग्राहकांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा एमजीएलचा प्रयत्न असेल, असे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे.

मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम
या दुर्घटनेनंतर पाइपलाइमधून कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने मुंबई आणि परिसरातील अनेक सीएनजी स्टेशन्सवर सीएनजीची कमतरता जाणवू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. या बरोबरच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी आपल्या इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचनाही कंपनीने केली आहे. ओएनजीसीचे कामकाज पूर्ववत सुरू झाल्यानंतर एमजीएल नेटवर्क असलेल्या ठिकाणांवर नियमित गॅस पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही कंपनीने जाहीर केले आहे.