Breaking News

क्रिकेटपटू मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट

Mohammad Shami
कोलकाता
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या अडचणीत वाढ झाली. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोप प्रकरणी त्याच्या विरोधात अलीपूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेय. मोहम्मद शमी आणि त्याच्या भाऊ हसिद अहमद या दोघांच्या विरोधात हे वॉरंट बजावण्यात आले असून त्यांना आत्मसमर्पणासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी शमीची पत्नी हसीन जहाँ हिने  मोहम्मद शमी याचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप  केला होता. तिने फेसबुकवर शमीच्या काही अश्‍लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केले होते. यामुळे शमी वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता. हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. या सगळ्या प्रकरणात पश्‍चिम बंगाल येथील अलीपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे शमीच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे