Breaking News

अर्धपोटी पाकिस्तान भारताशी लढणार कसा?

बालाकोटचं सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय यामुळं पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि तेथील मंत्री आता भारताशी युद्ध करण्याची भाषा करीत आहेत. जो देश समर्थ असतो, त्या देशानंच युद्धाची भाषा बोलली, तर ती समजण्यासारखं आहे; परंतु पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत आहे, तिथं कुपोषण आहे आणि तेथील लष्करी बळही भारताच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची खुमखुमी त्याच्याच अंगलट येणारी आहे.
एकीकडं भारताशी सशर्त बोलणी करायची भाषा करायची आणि दुसरीकडं भारताला युद्धाची धमकी द्यायची अशा गोंधळलेल्या अवस्थेत पाकिस्तान आहे. जागतिक पातळीवर कुठूनही मदत मिळत नसल्यानं पाकिस्तान एकाकी आणि अस्वस्थ आहे. काश्मीरचा प्रश्‍न भारताचा अंतर्गत प्रश्‍न असताना त्याला जागतिक बनविण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना कुठूनही यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायानं काश्मीरच्या प्रश्‍नाकडं लक्ष न दिल्यास आण्विक युद्ध होऊ शकतं, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा निर्णय मागं घेतला तरच भारताशी चर्चा शक्य आहे, असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अमेरिकेतील ’न्यूयॉर्क टाइम्स’मधील एका लेखामध्ये इम्रान यांनी भारताला युद्धाचा इशारा दिला आहे. काश्मीरबाबत भारतानं घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगानं काहीही न केल्यास दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या दिशेनं जातील, असं म्हटलं आहे. काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चा व्हायला हवी, असं इम्रान यांनी म्हटलं आहे; मात्र हे सांगताना काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्यात यावं, काश्मीरमधून संचारबंदी उठवावी आणि काश्मीरमधून भारतानं त्यांचं सैन्य मागे घ्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काश्मीरवरील चर्चेत काश्मिरींसहित सर्व स्टेकहोल्डरचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या प्रदेशात कुठं आणि किती सैन्य ठेवायचं, याचा अधिकार भारताचा असताना त्यात पाकिस्ताननं हस्तक्षेप करायचं काहीच कारण नाही. कुरेशी यांनी भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यात काहीच अडचणी नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत; मात्र भारत चर्चेला तयार आहे की नाही? यावरच सर्व काही अवलंबून असल्याचं कुरेशी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तानसोबत दहशतमुक्त आणि हिंसामुक्त वातावरणात द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.

भारतीय लष्कराच्या हवाई दलानं पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तान गांगरुन गेला आहे. गांगरलेल्या अवस्थेत त्याने भारताला धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. तसंच, भारतावर हल्ला करण्याचं वक्तव्यही केलं आहे. या वक्तव्यावरून अमेरिकेनंही पाकिस्तानला योग्य शब्दात समज देत कान उपटले आहेत. दहशतवाद्याच्या मुद्द्यावर अवघं जग विरुद्ध पाकिस्तान असं चित्र आहे, तरीही पाकिस्तान युद्धाची भाषा करतो. अर्थात युद्धाची धमक पाकिस्तानमध्ये नाही; परंतु तरीही समजा युद्ध झालंच तर भारतासमोर पाकिस्तानचा किती टिकाव लागू शकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरते. जगभरातील अनेक देशांच्या लष्करी शक्तीचा वार्षिक अभ्यास करून अहवाल मांडणारी संस्था ग्लोबल फायर पॉवर ही जगात प्रसिद्ध आहे. ग्लोबल फायर पॉवर संस्थेच्या हवाल्यानं प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या लष्करी शक्तीसमोर पाकिस्तानचा टिकाव लागणं मुश्कील आहे. पाकिस्तान लष्कराच्या कोणत्याही तुलनेत भारताची लष्करी ताकद दुप्पट आहे. ग्लोबल फायर पॉवरनं 2018 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढं आली आहे. एवढंच कशाला मागच्या महिन्यात पाकिस्तानातील लष्करी तज्ज्ञ आयेशा यांनीही पाकिस्ताननं युद्धाचा आव आणू नये, भारतासमोर पाकिस्तानचा निभाव लागणार नाही, असं म्हटलं होतं.
भारताकडं लढाऊ विमानांची संख्या 2,185 आहे, तर पाकिस्तानकडं लढाऊ विमानांची संख्या आहे 1,281. भारताकडं 4,426 टँक आहेत, तर पाकिस्तानकडं  केवळ 2182 आहेत. 136 देशांच्या लष्करी क्षमतेच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 17 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताची संरक्षणावर अर्थसंकल्पीय तरतूद कैकपटीनं अधिक असते. जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वांत शक्तिशाली देश आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीनं स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो. ग्लोबल रँकिंगच्यायादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आला आहे.


काश्मीरमध्ये जेव्हापासून कलम 370 मध्ये बदल करण्यात आला आहे, तेव्हापासून पाकिस्ताननं भारताला किमान दहा वेळा युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटलं आहे, की जर काश्मीरप्रकरणी जगातील नेत्यांची चुप्पी कायम राहिली तर संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागतील. त्यामुळं पाकिस्तान किती दिवस भारताशी युद्ध करू शकतो? आणि भुकेल्यापोटी पाकिस्तान आपल्याशी लढणार कसा? असे प्रश्‍न आहेत. पाकिस्तानवर सध्या 40 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज परत करण्याची क्षमता पाकिस्तानची राहिलेली नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननुसार, पाकिस्तानवर 2019 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 40,214 अब्ज पाकिस्तानी रुपयांचं (म्हणजे 40 लाख कोटी) कर्ज आहे. ते जीडीपाच्या 104% आहे. इम्रान यांनी सत्ता सांभाळल्यानंतर पहिल्या आठ महिन्यांतच सौदी अरेबिया, यूएई, कतार आणि चीनकडून नऊ अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज देश चालवण्यासाठी घेतलं आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी कार्यालयानुसार येथे जुलै महिन्यात महागाई दर 10.3 टक्क्यांवर गेला. एक महिन्याआधी तो 8.9 टक्के होता. गेल्या वर्षी जुलैत हा आकडा 5.8 टक्के होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत गॅसचे दर 143 टक्के आणि पेट्रोलचे दर 23 टक्क्यांनी वाढले आहेत. 2013 नंतर पहिल्यांदा महागाई दर दोन आकड्यांत गेला आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. देशातील साठ टक्के घरात अन्न सुरक्षेची चिंता आहे. 20.5 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेनुसार 60 टक्के घरात अन्न असुरक्षितता आहे. पाकिस्तानच्या 20.7 कोटी लोकसंख्येत 20.5 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. पाच वर्षांखालील 44 टक्के मुलं कुपोषित आहेत. पाकिस्तानमध्ये बहुतांश बजेट भुकेशी लढण्याऐवजी संरक्षणावर खर्च केलं जात आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2018 मध्ये पाकिस्तानची 180 देशांत 117 वी रँक होती. पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार मोठ्या नेत्यांपासून लहान विभागाच्या कर्मचार्‍यांपर्यंत व्याप्त आहे. या वेळी पाकिस्तानमध्ये विरोधी पक्षांचे 13 मोठे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत. त्यात तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम, माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी या नेत्यांचा समावेश आहे. सध्या पाकिस्तानात भाजीपाला विकत घेणं सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. फुलकोबी-180, पानकोबी ड्ढ 170, गाजर ड्ढ 140, ब्रोकोली ड्ढ 1600, हिरवा वाटाणा- 360, कांदा -100, टॉमॅटा-200, भेंडी-180, कारले-120 रुपये किलो आहेत. अशा देशात जगण्या-मरण्याचा प्रश्‍न तीव्र झाला असताना युद्धाची भाषा केली जात असेल, तर सामान्यांचा उद्रेक कधीही होऊ शकतो आणि त्याची फळं पाकिस्तानलाच भोगावी लागतील, एवढं नक्की.