Breaking News

घरगुती सिलिंडरचा स्फोट महिला ठार; चार गंभीर जखमी

मुंबई / प्रतिनिधी
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर चाळ कोसळली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 22 वर्षाीय तरुणी सुमारे 80 टक्के भाजली गेली आहे. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजू आनंद (वय-35) असे मृत महिलेचे नाव आहे. मालाड येथील एमएचबी वसाहतीत रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मालाड मालवणी येथील भारत माता शाळेसमोरील चाळ क्रमांक 91 मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता, की त्यामुळे चाळ कोसळली. मंजू आनंद यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यांना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत शीतल काटे (44), सिद्देश गोटे (19) ममता पवार (22) व अश्‍विनी जाधव (26) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी ममता पवार ही 22 वर्षीय महिला सुमारे 80 टक्के भाजली आहे. तिची प्रकृची चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे अश्‍विनी जाधव ही तरुणीही या दुर्घटनेत 15 टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर आहे.