Breaking News

काँग्रेसने जरा तरी लाज बाळगायला हवी

अमित शाह यांची टीका; राहुलच्या वक्तव्याचा पाकिस्तानकडून वापर

सिल्व्हासा
जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवण्यात आल्याचा विरोध केला जात असल्यावरून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे. कलम 370 वरील राहुल यांच्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत प्रशंसा होते, त्यांच्या या वक्तव्याचा वापर संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या याचिकेत पाकिस्तानकडून केला जातो, यासाठी काँग्रेसने जरा तरी लाज बाळगायला हवी, अशा शब्दांत शाह यांनी राहुल आणि काँग्रेसवर टीका केली.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीतील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसने कलम 370 हटवण्याचा विरोध केला, आजही राहुल जे वक्तव्य करत आहेत, त्याची पाकिस्तानात प्रशंसा होत आहे. त्यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान आपल्या याचिकेत करतो, काँग्रेसला लाज वाटायला हवी, की त्यांच्या वक्तव्याचा उपयोग भारताविरोधात केला जात आहे, असे ते म्हणाले.

जेएनयूत देशविरोधी घोषणाबाजीचे प्रकरण असो किंवा मग सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राइक असो; काँग्रेसने अशा गंभीर मुद्यांवर सरकारविरोधी भूमिका घेतलेली आहे. आम्ही हे विचारू इच्छितो, की तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करू इच्छित आहात? असा सवाल करून कलम 370 वरून देशाची जनता ठामपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यारोबर आहे, असा दावा त्यांनी केली. कलम 370 आणि 35-ए हे देशाच्या एकतेतील अडसर होते. मोदी यांना देशाने पुन्हा पंतप्रधान बनवले व त्यांनी संसदेच्या पहिल्याच सत्रात कलम 370 हटवले. मोदी यांच्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नव्हते, असे शाह म्हणाले. काँग्रेसाला उद्देशून गृहमंत्री शाह म्हणाले, की 70 वर्षे देशात अनेक पक्षांचे सरकार होते. काही लोकांच्या तीन-तीन पिढ्यांनी देशावर राज्य केले; मात्र त्यांच्यात कलम 370 हटवण्याची धमक नव्हती.

काश्मीरच्या विकासाचे मार्ग उघडे
कलम 370 हटवण्यात आल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे मार्ग उघडले आहेत. तसेच, कलम 370 हटवण्यात आल्यापासून या ठिकाणी शांततेचे वातारण आहे. या निर्णयापासून ते आतापर्यंत एकही गोळी चाललेली नाही. अश्रूधारांच्या नळकांड्याही फोडव्या लागल्या नाहीत. कोणालाही जीव गमवावा लागलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.