Breaking News

विकासकामांसाठी वृक्षतोड अनिवार्य : गडकरी

मुंबई 
 देशातील मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने घेतलेल्या कलम 370, तिहेरी तलाक यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचं समर्थन केलं. तसेच मोदी सरकारच्या इतर विकासकामांबद्दलही गडकरी यांनी माहिती दिली.
वृक्षारोपणाला महाराष्ट्र सरकारने खूप महत्त्व दिलं आहे. इथे सुरु असलेला हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी आदर्श आहे. विकासकामांसाठी काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य आहे. मात्र त्याची भरपाई म्हणून नवे वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विकासकामे यांचा समतोल राखणं महत्त्वाचे आहे. माझ्या काळात जेव्हा मी वांद्रे-वरळी सीलिंकचं काम सुरु केलं होतं, तेव्हाही किती याचिका आल्या, किती विरोध झाला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की, 400 कोटींचं काम 1800 कोटींवर गेलं. त्यामुळे आज टोलचा भुर्दंड येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे किती विरोध करायचा हे ठरवा, असा सल्ला गडकरींनी दिला. तिहेरी तलाक विरोधी कायदा बनवून सरकारने मुस्लीम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. तर कलम 370 मधील तरतूदी हटवून सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये विकास करण्यास सुरूवात केली आहे. तर ण-झ- मधील सुधारणाही देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गरजेची होती, असं गडकरींनी म्हटलं.