Breaking News

‘युनिव्हर्सल फौंडेशन’मुळे कलाकारांना सुवर्णसंधी : नियती घोडके

अहमदनगर/प्रतिनिधी
“दि युनिव्हर्सल फौंडेशनमुळे अनेक कलाकारांना हक्काचा रंगमंच मिळत असून अनेक प्रतिभावंत कलावंत नगरच्या मातीतून घडविले जातील. कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ‘टॅलेंट ऑफ अहमदनगर’ नगरकरांसाठी पर्वणीच आहे’’ असे प्रतिपादन युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारचे नेहरु युवा केंद्र संलग्न दि युनिव्हर्सल फौंडेशन राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ आयोजित ‘टॅलेंट ऑफ अहमदनगर’च्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री नियती घोडके यांनी बंधन लॉन, सावेडी येथे केले.
उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी अशोकराव सोनवणे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड. शिवाजी डमाळे, अ‍ॅड. महेश शिंदे, डॉ. अमोल बागूल, मायाताई जाधव, जयश्री शिंदे, मा.नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव, पोपटराव बनकर, प्रकल्प अधिकारी संध्याताई देशमुख, महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने व मुख्य संयोजक सागर अलचेट्टी, आदिती उंडे उपस्थित होते.
अशोकराव सोनवणे यांनी, “जिल्हास्तरीय टॅलेंट ऑफ अहमदनगरमधून कलेला प्रोत्साहन तर मिळतेच पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला जोपासणे आवश्यक आहे. नृत्य, गीत, गायन, अभिनय यामध्ये देखील करिअर करता येते, पण त्यासाठी सराव, योग्य मार्गदर्शन, परिश्रम आवश्यक असते’’, असे सांगितले.
दिवसभर चाललेल्या गीत, गायन, सोलो व ग्रुप नृत्य, मॉडेलिंग, अभिनय आदी स्पर्धांना भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे परीक्षण अनंत द्रविड, अरजितसिंग वधवा, महेश वाघमारे, दिनेश फिरके, फरीद सय्यद, अफरोज सय्यद, भक्ती मते आदींनी केले.
दुसर्‍या सत्रात ‘टॅलेंट ऑफ अहमदनगर’ अ‍ॅवॉर्ड शरद वाघमारे, विनायक नेवसे, अशोक भालके, शोभा निसळ, संस्कृती देशमुख, वैद्य राजेश कासार, गोरक्षनाथ तुपे, सुनील पावले, विजयमाला माने, गणेश शिंदे, संगीता भापसे, विक्रम घुले, नानासाहेब घोरपडे, प्रशांत कदम, सुनील मतकर, शेख सिकंदर, प्राचार्या वंदना शिंदे, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, फियोना गायकवाड, शीतल फुलपगार, सरोज घोडके, महिमा सिंध, साक्षी नायर, सुहास सोनवणे, अरविंद सहाभोर आदी 25 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी हार, तुरे, फेटे यावर खर्च न करता मान्यवरांना, जिल्हाभरातील संस्था प्रतिनिधींना समाजसुधारकांची पुस्तके देऊन सन्मानित केले. शहरात पाऊस पडत असतानाही हौशी पालक, शिक्षक मुलांना घेऊन लॉनमध्ये येत होती. तसेच याप्रसंगी स्वच्छ भारत अभियानांतर्गत 100 तास काम केलेल्या दिनेश शिंदे, दिपांशू चौधरी, अविष्कार वाडेकर, जयेश शिंदे, आवेज शेख, ओंकार वाघ यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश पेहवाल, गिरीराज जाधव, प्रदीप वाळके, सुलगणा दलपती, अनुराग झिरमिटे, वैभव धनगर, प्रणील गाडेकर, अंजली झिरमिटे, रोहित गोसावी, रजनी ताठे, अशोक कासार, शिवाजी नवले, स्वाती बनकर, दर्शन बनकर आदींनी परिश्रम घेतले.