Breaking News

लागोपाठ आलेल्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण

अहमदनगर/प्रतिनिधी
शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी सतत झटणार्‍या शहर पोलिसांचा लागोपाठ आलेल्या बंदोबस्तामुळे हा संयमाच्या परीक्षेचा काळ आहे. अनंत चतुर्दशीचा बंदोबस्त पूर्ण होत नाही, तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा मुख्यमंत्री यांचा जिल्हा दौरा आहे. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्तातून उंसत मिळणे कठीण होऊन बसले आहे. शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसाठी शहर, जिल्हा पोलिस दल प्रयत्नांची शर्थ करत आहे.
मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरे होत असून मोहरम विसर्जन काल शांततेत झाले. त्याअगोदर मोहरमची महत्त्वपूर्ण कत्तलच्या रात्रीची मिरवणूक देखील शांततेत झाली. भिंगार शहरातील मानाच्या देशमुख गणपती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखील गणेश विसर्जन शांततेत झाले. भिंगार येथील गणेश विसर्जन आणि मोहरमच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरात सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता. या बंदोबस्तातून उसंत मिळत नाही, तोच नगर शहरात आज देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होणार आहे. शहर पोलिसांनी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी अनंत चतुर्दशीला जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या गणेशोत्सवामुळे नगर शहर आणि जिल्ह्यात पोलिसांना बंदोबस्ताची शर्थ असणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून उत्सवाच्या असलेल्या बंदोबस्तानंतर लगेचच शुक्रवारी (ता. 13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा आहे. त्यामुळे उत्सवानंतरही पोलिसांना उसंत मिळणे कठीणच आहे.
मुख्यमंत्री यांचा दौरा होत नाही तोच, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यामुळे उत्सवातील बंदोबस्तातून सुटका होताच पोलिसांना विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी, प्रतिबंधकात्मक कारवायांसाठी आणि बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांचा हा काळ बंदोबस्ताचा आणि संयमाचा असाच आहे.