Breaking News

विद्यार्थ्यांनी साकारल्या बीजगणेश मूर्ती

अहमदनगर/प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी येथील यशश्री अ‍ॅकॅडमीत बीजगणेश मूर्ती बनविण्याची विनामूल्य कार्यशाळा घेण्यात आली. 750 शालेय विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाडूच्या मातीपासून इकोफ्रेंडली बीजगणेश मूर्ती  साकारुन त्यांची घरी प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, सा.बां.वि. चे कार्यकारी अधिकारी राऊत, ‘हरियाली’चे सुरेश खामकर, वनक्षेत्रपाल सागर माळी, यशश्री अ‍ॅकॅडमीचे कार्यकारी उपाध्यक्ष यश शर्मा, प्राचार्य पंडित, क्रीडा संचालक राजू पवार, सातपुते, वनपाल भोपे, वनरक्षक कदम, लखन शिंदे, घालमे, सोनवणे, तिपुळे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे यशश्री अ‍ॅकॅडमीचे कार्यकारी उपाध्यक्ष यश शर्मा यांनी कौतुक करुन, मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार घडणार असल्याचे सांगितले. मूर्तिकार धनंजय शिरसाठे यांनी गणपती बनविण्यासाठी सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बीजगणेश मूर्तीत फळे-फुलांचे व वनऔषधी वनस्पतीच्या बिया टाकण्यात आल्या आहेत. विसर्जनानंतर त्याला अंकुर फुटून ही वृक्ष बहरणार आहे. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, हरियाली संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह यशश्री अकॅडमीच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.