Breaking News

बेस्टच्या कर्मचार्‍यांना बाप्पा पावला; पाच ते दहा हजारांची पगारवाढ

मुंबई
 गेल्या अनेक वर्षांपासून वेतनवाढीच्या प्रतिक्षेत असणार्‍या बेस्टच्या कर्मचार्‍यांना अखेर बाप्पा पावला आहे. बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार कर्मचार्‍यांना साधारण पाच ते दहा हजारांची पगारवाढ मिळेल.  2016 ते 2021 या पाच वर्षांसाठी हा वेतन करार तयार करण्यात आला आहे. बेस्टच्या तब्बल 30 हजार कर्मचार्‍यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. तसेच दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना सानुग्रह वेतनही (बोनस) मिळेल. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरेल.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्‍वानाथ महाडेश्‍वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यात झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी बेस्ट कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचार्‍यांना वेतन देण्याच्या मागणी मान्यता मिळाली होती.
त्यामुळे आगामी काळात होणारे बेस्टचा संपही टळणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात बेस्टच्या कर्मचार्‍यांना आठ दिवसांचा ऐतिहासिक संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते.