Breaking News

रिपाइंच्या मेळाव्यातून महायुतीचे फुंकले जाणार रणशिंग

मुंबई प्रदेशचा 5 सप्टेंबर रोजी भव्य मेळावा

मुंबई
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या मुंबई प्रदेशचा भव्य मेळावा येत्या 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता वरळीतील हाजी अली दर्ग्यासमोर सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम; एनएससीआय क्लबच्या डोम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रिपाइंच्या या भव्य मेळाव्यातुन महायुतीचे सर्व नेते एकाच मंचावर येणार असल्याने महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग यावेळी फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिपाइंच्या या भव्य मेळाव्याकडे सर्व राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
मुंबई प्रदेशच्या भव्य रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्यास रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री अविनाश महातेकर, राज्यमंत्री योगेश सागर, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा राजाभाऊ सरवदे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी प्रमुख मान्यवर रिपाइंच्या महामेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. रिपाइंच्या या भव्य मेळाव्यातून महायुतीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा आहे. या रिपाइंच्या भव्य मेळाव्यास मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या मेळाव्याचे आयोजक रिपाइं मुंबई प्रदेशचे अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.