Breaking News

झोपडपट्टी धारकांचा नेवाशात 'रास्ता रोको'

राखीव वनविभागाचे क्षेत्र गावठाणाच्या विस्तारासाठी देण्याची मागणी


नेवासे/प्रतिनिधी

 नेवासे फाटा येथील वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे १२ हेक्टर ८२ आर क्षेञ आहे. त्यापैकी ४ हेक्टर क्षेञ गावठाणाच्या विस्तारासाठी, घरकुल व विविध शासनाच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत या मागणीसाठी आज (मंगळवार) नगर-औरंगाबाद महामार्गावर  नेवासा फाटा येथे झोपडपट्टी धारकांनी 'रास्ता रोको' केले.

 या आंदोलनाचे नेतृत्व मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांनी केले. यावेळी राजू साळवे, अॅड. बन्सी सातपुते, अड. अशोक करडक, अड. भाऊ सदाफुले, राजू बोलके, अमित मेहर, महेश निपुंगे, संजय निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य माऊली देवकाते, गणेश माटे आदींसह झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 यावेळी बोलतांना अड. बन्सी सातपुते म्हणाले की, वनविभागाचे १२ हेक्टर ८२ आर क्षेञ असून वनविभागाच्या जागेवर सुमारे ४७ वर्षांपासून गोरगरीब लोक चार हेक्टर क्षेञावर वास्तव्य करत आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार हेक्टर क्षेञ ग्रामपंचायतीसाठी वर्ग केल्यास त्यांना मुलभूत सुविधा मिळू शकतात. त्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन स्तरावर कायदेशीर मार्गाने कागद पत्राची पूर्तता केली जाईल.

  यावेळी निपुंगे म्हणाले की, वनविभागाच्या जागेत राहणाऱ्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी मोठा निधी ग्रामपंचायतीकडे पडून आहे. माञ जागेच्या प्रश्नामुळे त्यांना मुलभूत सुविधा व लोकवस्तीमध्ये विकास करण्याठी खोळंबा होत आहे. याबाबत शासनाकडून दखल घेण्यात यावी. आणि यावर कार्यवाही करावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी दिले.