Breaking News

बाजार आपटला: गुंतवणूकदार झोपले तीन लाख कोटींना

Share Market
मुंबई / प्रतिनिधी
सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर अपेक्षेपेक्षा खूपच कमी; तसेच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीने सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल 800 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 36 हजार पाचशे अंकापर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजारातही 225 अंकांची घसरण नोंदवून तो 10 हजार 782.85 पर्यंत खाली आला. दरम्यान, या घसरणीने गुंतवणूकदारांना दोन लाख 79 हजार कोटी रुपयांना फटका बसला आहे.

सुरुवातीच्या सत्रात सकाळी 10.22 वाजता सेन्सेक्स 413.58 अंकांनी घसरून 36 हजार 919.21 अंकांवर व्यवहार सुरू होते. निफ्टीतही 129.30 अंकांची घसरण नोंदवली होती. दरम्यान, उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये विक्री घटल्याने शेअर बाजारात निराशा आहे. उत्पादन घटल्याने केलेली गुंतवणूक आणि खर्च यातील नुकसानही अद्याप भरून निघाले नाही. याआधी जूनच्या तिमाहीत जीडीपी दर सहा वर्षांतील नीचांकीवर आला होता. ऑगस्टमध्ये वाहन विक्रीच्या आकडेवारीमुळे शेअर बाजारात निराशा आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत 33 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वाहनांची विक्रीही 58 टक्क्यांनी घसरली आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटोच्या वाहन विक्रीतही घट नोंदवली आहे.

मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. निफ्टीवर सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल निशाण्यावर बंद झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 2.79 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर कमी झाला. उत्पादन क्षेत्रात 95 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या 15 महिन्यातल्या खालच्या स्तरावर हे क्षेत्र आले आहे. कृषी विकासदर अवघ्या दोन टक्क्यांवर आले आहे. या वर्षी कापूस वगळता उर्वरित शेतीमालाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. तांदळाच्या उत्पादनात तर लक्षणाीय घट होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.

व्यापार युद्धाचाही परिणाम
अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध थांबायला तयार नाही. दोघांनीही एकमेकांच्या उत्पादनांवरचे आयात शुल्क वाढविले आहे. त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही होत आहे.