Breaking News

राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी

मुंबई
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. येत्या शुक्रवारी, 13 सप्टेंबर रोजी भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वतः भास्कर जाधव यांनीच सोमवारी माध्यमांना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच आपण शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पैकी एक आमदार शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. भास्कर जाधव यांनी सोमवारी चिपळुणात आपल्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना प्रवेशासाठी 13 सप्टेंबरचा मुहूर्त काढल्याची घोषणा केली. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाधव यांचाशिवसेना प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आपला राग नाही आणि आपण त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. जर उध्दव ठाकरे यांनी संधी दिली तर गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवू, असे वक्तव्य जाधव यांनी यावेळी केले. गुहागर आणि चिपळूणमधील राष्ट्रवादीचे काही पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुक्यातील 73 सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी बोलताना दिली. आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या पक्षबदलामुळे आणखी नुकसान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा फटका बसला आहे. दोनच दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जिल्हा परिषदेचे नऊ सदस्य आणि 73 सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून, या दोन्ही पक्षांचे नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहेत. येत्या काही दिवसांतही काही नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यात आता भास्कर जाधव शिवसेनेत येणार असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. कोकणातील आणखी एक नेते अवधूत तटकरे यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.