Breaking News

ज्ञानाच्या माध्यमातून उत्कर्षाकडे जाण्याचा प्रयत्न करा :

प्रा.डॉ.लांडगे ; जय श्रीराम विद्यालयात पालक मेळावा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे फाटा (मुकींदपूर) येथील जय श्रीराम विद्यालयात आयोजित पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. मुलांच्या भवितव्य घडविण्यासाठी कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून उत्कर्षाकडे जाण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शिरीष लांडगे यांनी यावेळी बोलतांना केले.
 यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. तर भेंडे येथील प्रा.डॉ. शिरीष लांडगे व प्रा.डॉ.शरदराव कोलते, कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे, नेवासे तालुका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ डहाळे, सचिव शंकरराव नळकांडे, संस्थेचे संचालक अरविंद मापारी, अशोक डहाळे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना प्रा.डॉ.शिरीष लांडगे म्हणाले की, आपण चांगल्या पध्दतीने नागरिक बनू का ? मला वाचता येईल का ? याचा विचार करेल तो यशाच्या दिशेने जाऊ शकेल. मुलांचे भवितव्य घडले पाहिजे, यासाठी पालकांनी देखील कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा, मुलांना जे आवडते त्यामध्ये त्याला वाहून कसे घेता येईल यासाठी मुलांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
 अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे म्हणाले की, मुलांना काय पाहिजे, त्यांचा अभ्यास कसा आहे. याची विचारपूस पालकांनी केली पाहिजे. अभ्यासाबाबत त्यांची काळजी घेणे हे ही पालकांचे कर्तव्य आहे.
  यावेळी प्रा.माकोणे, प्रा.डॉ.पंढरीनाथ म्हस्के, प्रा.तांबे, लक्ष्मण निपुंगे, माजी शिक्षक शिवाजीराव गायके, शिक्षिका विजया सरगैये, दशरथराव मुंगसे, पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव बहिरट, सीताराम निपुंगे, सचिन गव्हाणे उपस्थित होते.