Breaking News

कसोटी मालिकेतही भारताचा वेस्ट इंडिजवर ‘व्हाईटवॉश’

दुसर्‍या कसोटीत 257 धावांनी विजय ; हनुमा विहारी सामनावीर

Virat Kohali
जमैका
भारतीय क्रिकेट संघाने टी-20 नंतर वन-डे, पाठोपाठ आता कसोटीमध्ये देखील वेस्ट इंडिजला धूळ चारली आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला.
भारतीय संघाने कसोटीत 257 धावांनी विजय साकारला. मालिकेत 2-0 अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसर्‍या डावात अर्धशतक झळकावणार्‍या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसर्‍या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. तिसर्‍या दिवसाच्या अखेरीस विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं होतं. वेस्ट इंडिजला विजयासाठी दिलेलं आव्हान अशक्यप्राय असल्यामुळे भारत चौथ्या दिवशीच सामना जिंकणार हे निश्‍चीत झालं होतं. अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजला खिंडीत पकडलं. विंडीजच्या काही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. ब्रुक्सने अर्धशतक झळकावत विंडीजचा पराभव पाचव्या दिवशी ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही विराट कोहलीच्या अचूक फेकीवर धावबाद झाला. अखेरच्या फळीत ब्लॅकवूड-होल्डर जोडीनेही छोटेखानी भागीदारी रचत विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडून देण्यात मदत केली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर विंडीजचे इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस सामन्यात बाजी मारत भारताने वेस्ट इंडिज दौर्‍याचा शेवट गोड केला. वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात दोन्ही संघ 3 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान, या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण 120 गुण झाले आहेत. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. विराटसेनेचा विंडीज दौरा यशस्वी संपला आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकामध्ये टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत 257 धावांनी बाजी मारत मालिकेत 2-0 अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसर्‍या डावात अर्धशतक झळकावणार्‍या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसर्‍या डावात भारताकडून मोहम्मद शामी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. विराट कोहलीने माजी कर्णधार एम. एस धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा 28 वा विजय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 27 कसोटी सामने जिंकले होते. माजी कर्णधार धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताला 27 सामने जिंकून दिले होते. कोहलीने 48 व्या सामन्यात 28 वा विजय साजरा करत नवा विक्रम नावे केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याशिवाय 48 सामन्यात सर्वात कमी पराभाव विराट कोहलीने पाहिले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत. 2014 मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाची सुत्रे सांभाळली होती.