Breaking News

भिंगार शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट

भिंगार/प्रतिनिधी
भिंगार शहरात सध्या कल्याण विशाखापट्टनम हायवेवर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ, पोलिस लाईनसमोर, भिंगार गावातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून ते रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून रस्ता अडवून बसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते व जाणार्‍या येणार्‍या गाड्यांना बाजूने जाण्याची कसरत करावी लागते व त्यामुळे अपघाताचे प्रसंग उद्भवतात.
भिंगार शहरात शुक्रवार व रविवार आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो. बाजारात सुद्धा जनावरे मोकळ्या प्रमाणात फिरत असून बाजार करणार्‍या महिला व पुरुष नागरिकांना याचा त्रास होतो.
शहरात मोकाट कुत्रे यांचेही   वर्चस्व   बर्‍यापैकी वाढल्यामुळे भिंगार नाला परिसरात, भिंगार बँक चौक  परिसर, महात्मा फुले पतसंस्था, पोलिस लाईन, भिंगार गाव, सदर बाजार, गवळीवाडा येथे मोकाट कुत्रे मोटरसायकलस्वार किंवा पायी जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जातात . चावा घेतल्यामुळे बरेचसे नागरिक जखमी झालेली आहेत.
शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी शाळेजवळ नाथा राऊत यांच्या दुकानाजवळ शालेय विद्यार्थिनीवर कुत्र्याने अचानक हल्ला केला. स्थानिक  नागरिकांनी त्या शालेय विद्यार्थिनीला वाचवले व पुढचा होणारा मोठा अनर्थ टळला. अशा होणार्‍या घटनांना जबाबदार कोण? कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे कोंडवाडा असून त्याचा उपयोग उपयोग होत नसल्याचे निदर्शनास येते व पिसाळलेली मोकाट कुत्रे यांना वेळीच प्रतिबंध न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने यात लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी भिंगार शहर व परिसरातील  नागरिकांची मागणी जोर धरत आहे