Breaking News

श्रावण, भाद्रपद मंदीचेच; परंतु पराभूतांचे अरुण्यरुदनः मोदी

पाटणा
श्रावण-भाद्रपद महिन्यांत अर्थव्यवस्थेत नेहमी मंदी असतेच; मात्र यंदा काही लोक राजकीय पराभवाचा राग व्यक्त करण्यासाठी मंदीबाबत जास्त गोंधळ घालत आहेत, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केली.
देशात सध्या अर्थव्यवस्थेत सुस्तीचे वातावरण असून अनेक क्षेत्रातील गुंतवणुकीवर आणि रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नव्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी दर हा पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या साडेसहा वर्षांतील हा आर्थिक वाढीचा नीचांकी दर आहे. या पार्श्‍वभूमीवर सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या हे विधानाने अनेकांना आश्‍चर्यचकित केले आहे.
सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे, की केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी 32 सुत्री कार्यक्रमाची घोषणा केली आहे. तसेच 10 छोट्या बँकांच्या विलीनीकरणातून बँकांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम पुढील तिमाहीत दिसून येईल. बिहारमध्ये सध्या मंदीचा विशेष परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे वाहनांच्या विक्रीतही घट झालेली नाही. अर्थव्यवस्थेतील या मंदीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच तिसर्‍या पॅकेजचीही घोषणा करणार आहे.